अत्याचाराचा एकजुटीने प्रतिकार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:37 PM2017-11-22T23:37:36+5:302017-11-22T23:38:02+5:30
महिलांनी समाज-समाजात पंच म्हणून वावरताना जवळ असलेली ज्ञानाचा शिदोरी योग्यरीतीने हाताळून जनजागृती करावी.
आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : महिलांनी समाज-समाजात पंच म्हणून वावरताना जवळ असलेली ज्ञानाचा शिदोरी योग्यरीतीने हाताळून जनजागृती करावी. हे करीत असताना भेदाभेद करण्यास तिलांजली व्हावी. महिला उन्नतीसाठी असलेली आयुधे विविध माध्यमामधून हस्तगत करून अन्याय अत्याचाराविरूद्ध एकजुटीने प्रतिकार करावा, तरच महिला तरूणाईचा विकास संभव होऊ शकतो, असे प्रतिपादन रत्नमाला वैद्य यांनी केले.
ठाणा पेट्रोलपंप येथे महिला राजसत्ता आंदोलन समिती फलकाचे अनावरण प्रसंगी महिला मेळाव्या विभागीय समन्वयक रत्नमाला वैद्य बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा संघटिका शालु तिरपुडे या होत्या. यावेळी बेला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शारदा गायधने, तालुका संघटीका रिता सुखदेवे, पंचायत समिती विस्तार अधिकारी अतुलकुमार वर्मा, विदर्भ कोकण ग्रामीण बँक व्यवस्थापक जोशी, माजी सरपंच कल्पना निमकर, सरपंच सुषमा पवार, शशीकांत भोयर ग्रामपंचायत ठाणाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
माजी सरपंच शारदा गायधने म्हणाल्या की गावातील महिलांनी ग्रामपंचायतच्या सर्व ग्रामसभामध्ये आवर्जून उपस्थित राहुन आपल्या अधिकार व कर्तव्याची जाणीव करून घ्यावी. त्यानुसार महिला वर्गाचा किंबहूना गावाचा चौमुखी विकास करावा.
विस्तार अधिकारी वर्मा म्हणाले की, महिला बचत गटाद्वारे अधिकाधिक कृटीर उद्योग उभारून स्वालंबी बनावे. याकरिता कार्यक्षम महिला उद्योजक बनने काळाची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात जिल्हा संघटिका शालु तिरपुडे म्हणाल्या की, तरूण युवतीला दैनिक शालेय जिवनापासून ते संसारीक जिवनापर्यंत जीवन जगत असताना विविध प्रसंगाला तोंड द्यावे लागतो.
याकरिता त्यांना शालेय स्तरावर योग्य मार्गदर्शन देणे त्यांना पुढील आयुष्यात लढा देण्यासाठी सक्षम बनविणे ही आजच्या घडीला महत्वाची बाब झालेली आहे. प्रास्ताविक उमरीचे सरपंच आरती रंगारी यांनी केले. संचालन आशा शेंडे यांनी केले. आभार कुंदलता उके यांनी मानले. यशस्वितेसाठी महिला राजसत्ता आंदोलन समितीचे ठाणाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.