विकासात जिल्हा अव्वल ठेवण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:24 AM2019-08-02T01:24:34+5:302019-08-02T01:25:11+5:30
प्रशासनाचा महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविण्याची व समन्वयाची जबाबदारी महसूल विभागावरच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रशासनाचा महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविण्याची व समन्वयाची जबाबदारी महसूल विभागावरच आहे. आजच्या महसूल दिनानिमित्त सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासोबतच आपला जिल्हा विकासात अव्वलस्थानी नेण्याचा संकल्प करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समभागृहात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बडे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व तहसिलदार अक्षय पोयाम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी महसूल दिनाचे महत्व विषद केले. यासोबत पीएम किसान योजना अभिलेख्याचे संगणकीकरण, आयुष्मान भारत, घरपोच प्रमाणपत्र या शासनाच्या महत्वाकांक्षी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना साहित्य व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कुटूंब अर्थसहाय्य योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय अभियानांतर्गत अंत्योदय शिधापत्रिका, उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस किट व सिलिंडरचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. त्याचप्रमाणे वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रुपांतरीत केलेले सातबारा नागरिकांना वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड यांनी केले. शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विलास ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन तहसिलदार अक्षय पोयाम यांनी केले. कार्यक्रमास महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.