पालकमंत्र्यांनी केले २७ समस्यांचे निराकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:27 PM2018-06-18T23:27:28+5:302018-06-18T23:27:59+5:30
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतलेल्या बैठकीत नागरिकांच्या विविध २७ समस्या निकाली काढून नागरिकांना न्याय दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतलेल्या बैठकीत नागरिकांच्या विविध २७ समस्या निकाली काढून नागरिकांना न्याय दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चव्हाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मंजूषा ठवकर, अधीक्षक उत्पादन शुल्क ज्ञानेश्वरी आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येणाऱ्या दवडीपार (बेला) येथील आंशिक पुनर्वसन संदर्भात नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पालकमंत्री यांनी अशा स्वरुपाच्या २२ गावांची बैठक घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. नागपूर अधिवेशनात या संदर्भात जलसंधारण मंत्री यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दवडीपार येथील ९८ घरांचे पुनर्वसन करण्याबाबत व गोसेबाधित स्मशानभूमी करीता जागा मिळणेबाबत नागरिकांनी निवेदन सादर केले होते. स्मशानभूमी १५ आॅगस्टपूर्वी बांधून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मौजे चिचाळ येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीबाबत सादर निवेदनावर निर्णय देतांना पालकमंत्री यांनी ३० जूनला सदर इमारतीचे उद्घाटन करण्याच्या सूचना दिल्या. त्यासोबतच पाणी टंचाईबाबत योग्य निर्णय घेण्याचे सांगितले.
भंडारा शहर बायपास रोड दुरुस्तीकरण व अतिभार वाहतूक बंद करण्याबाबतच्या निवेदनावर तात्काळ निर्णय घेवून संबंधितांना सूचना केल्या. शासकीय आधारभूत धान खरेदीसाठी दिलेल्या गोदामाच्या भाडे संदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जलयुक्त शिवार, कर्जमाफी, प्रकल्पग्रस्त शेतकºयांना प्रकल्पात गेलेल्या जमीनीची वाढीव रक्कम, भिमलकसा जलाशयाचे पाणी मिळण्याबाबत, नेरला उपसा सिंचन अंतर्गत पिकाचा मोबदला मिळण्याबाबत, गोंडीटोला येथील तेंदु फाटा तलावाचे गेट दुरुस्तीकरण, बावनथडी प्रकल्प उजवा कलवावरुन पाईपलाईन व मौजा सामेवाडा, तालुका लाखनी येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पाणी उपलब्ध करुन देणे आदी महत्त्वाच्या समस्या पालकमंत्री यांनी या बैठकीत निकाली काढल्या. त्याच प्रमाणे अनेक नागरिकांनी आपल्या वैयक्तिक समस्यांचे निवेदन सादर केली होती. या निवेदनावर पालकमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेवून न्याय देण्याची भूमिका बजावली. यावेळी पालकमंत्री यांनी नागरिकांच्या अनेक समस्यांचा निपटारा केला.