सफाई कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा!
By admin | Published: April 3, 2017 12:36 AM2017-04-03T00:36:16+5:302017-04-03T00:36:16+5:30
जिल्ह्यातील नगरपरिषद, आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
दिलीप हाथीबेड यांचे निर्देश : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले समस्या सोडविण्याचे आदेश
भंडारा : जिल्ह्यातील नगरपरिषद, आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सफाई कामगाराच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देवून त्या प्राधान्याने सोडवा, अशा सूचना राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व सफाई कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, भंडाराचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे उपस्थित होते.
हाथीबेड पुढे म्हणाले, सफाई कामगार अशिक्षित असल्याने त्यांना कायद्याविषयक तसेच आपल्या अधिकाराविषयक पाहिजे तेवढे ज्ञान नसते. ते आपल्या मागण्या बरोबर मांडू शकत नाही. म्हणून त्यांच्या समस्येचा विचार करून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान राबविला आहे. या स्वच्छतेशी आधीपासून जुळलेल्या या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या परिवारांना माणूसकीच्या भावनेतून न्याय मिळवून द्या, असेही ते म्हणाले.
यावेळी सफाई कामगार संघटनेच्या सदस्यांनी विविध प्रश्न व समस्या मांडल्या. त्यांचे निराकरण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. नगर परिषदेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, महागाई भत्ता, त्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती, पद भरती, पदोन्नतीबाबत कारवाई करावी, नगर परिषदेतील सफाई कामगारांचे हजेरीपट कार्यालयात नेहमी ठेवून त्यांना ते अद्ययावत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना दिले. नगरपरिषदेत रिक्त असलेल्या पदांची भरती आकृतीबंधानुसार लवकरात लवकर करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भंडारा, पवनी, तुमसर नगरपरिषद, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेतील सफाई कामगारांच्या समस्यांचा व इतर अनेक प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. संचालन मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी केले. या बैठकीला सर्व संबंधित विभागाचे विभागप्रमुख, सफाई कामगार संघटनांचे पदाधिकारी व सफाई कामगार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)