लोकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प करु या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2016 12:32 AM2016-08-02T00:32:54+5:302016-08-02T00:32:54+5:30
केवळ महसुलच नाही तर सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडविण्याचा आजच्या दिनी संकल्प करु,
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : महिला सक्षमीकरण महसूल सप्ताहाचे उद्घाटन
भंडारा : केवळ महसुलच नाही तर सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडविण्याचा आजच्या दिनी संकल्प करु, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
विविध कामासाठी शासकीय कार्यालयात येणऱ्या महिला तसेच कार्यरत महिला अधिकारी-कर्मचारी यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक मिळाली पाहिजे, सोबतच त्यांचे काम सुलभरित्या व्हावे, असेही त्यांनी सांगितले. ते महसूल विभागाच्या वतीने आयोजित महिला सक्षमीकरण महसुल सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. या कार्याक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी प्रदिप डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, सुजाता गंधे, विजय उरकुडे, सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम, तहसिलदार संजय पवार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, लोकाभिमुख सेवा देण्यासाठीच आपली नेमणूक झाली असून लोकांची कामे जलदगतीने व्हावी. शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांसाठी सर्व विभाग प्रमुखांनी महिला सहायता कक्षाची स्थापना करावी अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. या सप्ताहात होणाऱ्या मेळाव्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन शासनाच्या योजना समजून घ्याव्यात व त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर महिला सक्षमीकरणात महसुल विभागाचे योगदान या विषयावर बोलतांना म्हणाल्या, प्राचीन काळापासून जमीन हे सत्तेचे केंद्र राहिले आहे. परंतु महिलांची नोंद त्यांत फार कमी आहे. महिलांना पुरुषांच्या तुलनेत हिस्सेदारी कमी आहे. सर्व योजनांची अंमलबजावणी महसूल विभागाकडे दिली आहे. तलाठी व सचिवापर्यंत महिलांनी वेळोवेळी चांगले काम केले आहे. महिलांसाठी कार्यालयात चांगली वातावरण निर्मिती केली पाहिजे. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. महसूल विभागातर्फे या विषयावर कार्यशाळेचे आयोजन सुध्दा करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय उरकुडे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. तसेच महिलांनी जागरुकपणे मतदार नोंदणी करावी, असे आवाहन करुन नोंदणी, वगळणी व दुरुस्ती कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. प्रस्ताविकात सुजाता गंधे म्हणाल्या, महसुल दिनानिमित्त १ आॅगस्ट ८ आॅगस्ट पर्यंत महिला सक्षमीकरण सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहात जिल्ह्यात उपविभागीय व ग्रामस्तरावर १४६ मेळावे घेण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच महिलांचे प्रश्न व अडीअडचणी सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. या मेळाव्यात महिलांनी मोठया प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या सप्ताहाचा ब्रीद वाक्य 'ताई मावशी अक्का आता जग जिंका' असे आहे. यावेळी असर फाऊंडेशनच्या वतीने उठा सकळ जन लवकरी नवी पहाट झाली या विषयावर पथनाट्य सादर केले. यात व्यसनमुक्ती, सातबारा, स्त्रियांना प्राधान्य, मत्स्यव्यवसाय, भ्रुणहत्या, आधारवड योजना, नवमतदारांसाठी विशेष मतदार मोहिम व इतर योजनांच्या जनजागृतीवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना धनादेश वाटप, मतदान छायाचित्र ओळखपत्र, सातबारा वाटप, नैसर्गिक आपत्तीत विज पडून जखमी झालेल्यांना धनादेश वाटप, राजस्व अभियानांतर्गत प्रमाणपत्र वाटप, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलीयर वाटप, विद्यार्थींनीना सायकलचे वाटप तसेच महाराजस्व अभियानांतर्गत वर्ग २ च्या जमिनीचे वर्ग १ मध्ये रुपांतरणाबाबत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महसूल दिनानिमित्त महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अव्वल कारकून, कनिष्ठ लिपीक, लघू लेखक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, वाहनचालक यांचा मान्वरांच्या हस्ते उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांनी केले. महसुल सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले. त्यांचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केला. (नगर प्रतिनिधी)