रस्त्यावर धूळ, राखेमुळे श्वसनाचे त्रास; डोळे चोळायचे की वाहन चालवायचे? नागरिकांचा संतप्त सवाल
By युवराज गोमास | Published: March 14, 2024 07:43 PM2024-03-14T19:43:12+5:302024-03-14T19:43:36+5:30
निर्माणाधीन बायपास मार्गामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या
युवराज गोमासे, भंडारा: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतुकीचा त्रास कमी व्हावा, अपघात थांबावे तसेच वाहतूक कोंडी दूर व्हावी, या हेतूने शहराच्या दक्षिणेला सहापदरी बायपास मार्गाचे काम धडाक्यात सुरू आहे. महामार्ग बांधकामासाठी औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु, पर्याप्त पाणी शिंपडले जात नसल्याने भिलेवाडा, कारधा दरम्यान नेहमी अवजड वाहन जाताच धुळीचे लोळ उडून वाहतुकदारांच्या डोळे व नाकातोंडात जात आहे. यामुळे वाहतुकदारांना डोळे व श्वसनाचा त्रास होत आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मुजबी ते पलाडी दरम्यान सुमारे १४.८ किमी लांबीचे भंडारा शहर बायपास मार्गाचे काम मंजूर केले. मंजूर बांधकामासाठी ७३८ कोटी ६७ लाखांचे अंदाजपत्रकीय खर्च अपेक्षीत आहे. बांधकामामध्ये १ उड्डाणपूल, दोन भूमिगत रस्ते, लहान व मोठ्या स्वरूपाचे पूल, १७ किमी लांबीचा सर्वीस रोड, ४ बसथांबे, नाली बांधकाम व अन्य बांधकामाचा समावेश आहे. विकासाचा राजमार्ग म्हणून या सहापदरी बायपास मार्गाचे बांधकामाकडे पाहिले जात आहे. सदर बांधकामाचे कंत्राट स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीस आहे. बायपास मार्गाचे बांधकाम धडाक्यात सुरू आहे. बहुतेक ६० टक्क्यांपर्यंत बांधकाम झाले असून उर्वरीत बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे.
चारचाकीपेक्षा दुचाकीस्वार त्रस्त
पलाडी ते भिलेवाडा दरम्यान सुरू असलेल्या बांधकामामुळे धुळीचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहन चालकांना सहन करावा लागतो आहे. मार्गावरून अवजड वाहने जाताच राख हवेत उडते. वाहन चालकांच्या डोळ्यात व श्वासात राख शिरून गुदमरल्यासारखे वाटायला लागले. पांढरे कपडे अल्पावधीत मळतात. डोळ्यांची जळजळ सुरू होते. रस्त्याकडे पाहणे अवघड होते. भिलेवाडा व कारधा दरम्यान उडणारी राख व धूळ वाहतुकदारांसाठी अडचण निर्माण करणारी ठरत आहे.
पाणी शिंपडण्यासह अन्य उपायांची गरज
पलाडी ते कारधा टोलनाका दरम्यान महामार्गावर राख, माती व मुरुमाचा वापर बांधकामात होत आहे. त्यामुळे या भागात नेहमीच धुळीचे साम्राज्य असते. यामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. महामार्ग परिसरातील नागरिकांनाही श्वसनाचे विकार होण्याची नाकारता येत नाही. यावर मात करण्यासाठी स्वामी समर्थ इंजिनिअरिंग लिमिटेड ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सकाळ, दुपार व सायंकाळी पर्याप्त पाणी रस्त्यावर शिंपडणे तितकेच गरजेचे आहे.