विद्यार्थी सुरक्षेच्या नावावर वाहतुकीवर निर्बंध
By Admin | Published: October 20, 2016 12:29 AM2016-10-20T00:29:04+5:302016-10-20T00:29:04+5:30
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी नियम तयार करण्यात येतात.
खासगी शाळांसाठी नियमांची सक्ती : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा एस.टी.ने सुविधांविना प्रवास
भंडारा : इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी नियम तयार करण्यात येतात. दुसरीकडे शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी एस.टी.ने प्रवास करतात. त्यामुळे या सुविधा राज्य परिवहन विभागाच्या बसेसमध्येही असाव्यात. परंतु परिवहन विभागाकडून नियमांची पायमल्ली होत आहे. खाजगी शाळांच्या बसेसमध्ये सर्व सुविधा हव्यात आणि परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये नियम का नाही? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
बदलत्या काळात शिक्षणाचे स्वरूप बदलले. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे सर्वांचा कल वाढला. खेड्यातुन शहराकडे आणि शहरातुन महानगरातील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवाशाची संख्याही वाढली. प्रत्येक शाळा आपआपल्या सुविधेनुसार वाहतुक व्यवस्था करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवासाची वाढती संख्या लक्षात घेऊन बाजारात वाहनाची रेलचेल वाढली. त्यातच राज्य परिवहन विभागाला उत्त्पन्न वाढवण्याची कल्पना सुचल्याचे दिसून येत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वाहतुक व्यवस्थेसाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या नावावर नवनविन नियम व एकाच एसटीत एकावरएक उभे राहुन प्रवास करणारे आणि तासनतास बसच्या प्रतिक्षेत रात्री उशिरा येणारे विद्यार्थी आणि बसेसची सुविधा नसल्यामुळे शाळा बुडणाऱ्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची वाहतुक करणाऱ्या वाहनासाठी सुरक्षेच्या नावावर नवनविन नियम लावण्यात येतात. परवान्याची आवश्यकता, परवाना नुतनीकरण, प्रवेश क्षमता, शाळास्तरावर सुरक्षा समिती वाहन थांबे, परवाना शुल्क, अग्निशमक यंत्र, दरवाजे-खिडक्या, पायदान, अशा अनेक सुविधाचे आणि परीवहन विभागात नियमीत तपासणी होते.
परंतु, लाखो विद्यार्थी शासकीय शाळेत शिक्षणासाठी प्रवास करतात. त्यांच्यासाठी घरघर आवाज करणारी बस. त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी, बसायला तर सोडा उभे राहण्याची सोय नाही. एकावर एक उभे राहुन विद्यार्थी मनस्तापात शिक्षण घेतात. अनियमीत बसफेऱ्या त्रासदायक आहेत. ६ तासाच्या शाळेत १४ तास निघून जात आहेत. बसची प्रतिक्षा आणि त्यासाठी होणारी धावपळ जीवघेणी ठरत आहे. शालेय वेळेवर बस सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थ्याची शाळा बुडत आहे. विद्यार्थ्याची सुरक्षा महत्त्वाची आहे. तर सर्वस्तरावर सारखे नियम लागू करून सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या वाहतुक व्यवस्थेत बदल आवश्यक आहे. बसची पास नियमीत काढून त्यासाठी अॅडव्हान्स पैसे भरणाऱ्या विद्यार्थ्याच्या नशिबात दुर्देवी प्रवास का? असा प्रश्न पालकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
पालकावर नाहक भुर्दंड
विद्यार्थी सुरक्षेच्या नावावर शासनाने लावलेले नियम आणि त्यासाठी आकारलेले शुल्क व तपासणीच्या नावावर होणारी लुट ही पालकांच्या खिशातून होते. शुल्काच्या स्वरुपात शासनाला द्यावे लागणारी रक्कम पालकांच्या खिशातून वाढीव प्रवास शुल्कस्वरुपात वसुल केली जाते. अनेक शाळाच्या प्रवेश शुल्कापेक्षा जास्त खर्च हा प्रवासावर होतो. सुरक्षा महत्वाची आहे. पण मग सर्वाना समान नियमावली हवी. खासगी वाहतुकीकरीता नियम आणि एसटीत शिथीलता नको.
अवैध प्रवाशी वाहतुक दुर्लक्षित
राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवाशी वाहतुक सुरु आहे. याकडे आर्थिक संबधातुन हेतुपरस्पर दुर्लक्ष करून वाहतुक विभागाने शाळा-महाविद्यालयाच्या खासगी वाहतुक व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केले आहे. नियमांचे पालन होत नाही म्हणून अर्ध्या रस्त्यात विद्यार्थ्यासह बस अडवून उभ्या केल्या जातात. तपासणीच्या नावावर शालेय वेळात बस उभ्या केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणारे विद्यार्थी सर्वसाधारण प्रवासी म्हणून प्रवास करतात. परंतु स्कूल बस म्हणून धावणाऱ्या बसेसकरीता मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. विद्यार्थी सुरक्षेकरीता शासनाने जीआर काढलेले आहे. स्कूल विद्यार्थ्यांसाठी मानव विकास अंतर्गत बस सेवा आहे.
- एस. निमजे, उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी, भंडारा.