वातावरणाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2015 12:35 AM2015-09-19T00:35:37+5:302015-09-19T00:35:37+5:30
मागील महिनाभरापासून कडाक्याचे उन्ह तापत होते. त्यातच बुधवारच्या रात्रीपासून गुरुवारला दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली.
रुग्णालये फुल्ल : लहान मुले सर्दी-पडशांनी त्रस्त
भंडारा : मागील महिनाभरापासून कडाक्याचे उन्ह तापत होते. त्यातच बुधवारच्या रात्रीपासून गुरुवारला दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारला पुन्हा कडक उन्ह तापल्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला. परिणामी विषाणुजन्य आजार बळावले. लहान मुलांना सर्दी, पडशांनी ग्रासले असून शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही गर्दी दिसून आली.
मागील १५ दिवसांपासून लहान मुले तापासह सर्दी व खोकल्यांनी ग्रस्त आहेत. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. जिल्हा मुख्यालयी असलेल्या भंडाऱ्यात सामान्य रुग्णालयात बालकांसाठी विशेष कक्ष आहे. याशिवाय शहरात सात ते आठ बालरोग तज्ज्ञांची खासगी रुग्णालये आहेत. शासकीय व खासगी या सर्वच रुग्णालयांमध्ये लहान मुलांना उपचारासाठी घेऊन आलेल्या पालकांची गर्दी दिसून आली. या रुग्णालयातील सर्वच खाटा बालरुग्णांनी फुल्ल दिसून आले.
उकाडा वाढला
मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यावेळी कडाक्याचे उन्ह तापत होते. हे तापमान ३८ अंशावर पोहोचले. त्यानंतर गुरुवारला सर्वत्र जोरदार पाऊस झाला. दिवसभर पावसाची झळ होती. त्यानंतर शुक्रवारला पाऊस गायब झाला आणि ऊन्ह तापले. आजचे तापमानही ३४ अंश नोंदविण्यात आले. बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे विषाणुजन्य आजाराने ग्रासले आहे. गुरुवार व शुक्रवारला रुग्णालयात आलेल्या बालकांना ताप, सर्दी व पडसे अशी लक्षणे दिसून आली.
मोठ्यांनाही सर्दी-पडसे
लहान मुलांसह महिलाही सर्दीने त्रस्त दिसून आल्या. मुलांना रुग्णालयात आणलेल्या बहुतांश महिलाही तापाने होत्या. स्तनदा मातांना ताप असेल तर तिच्या बाळालाही ताप येतो. त्यामुळेही मुलांच्या आजारांचे प्रमाण वाढलेले दिसून आले. (जिल्हा प्रतिनिधी)
बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे बदलत्या हवामानाचा लहान मुलांवर लवकर परिणाम होतो. मागील काही दिवसांपासून तापणारे ऊन्ह आणि गुरुवारला आलेल्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाला. हा विषाणुजन्य आजार असून पालकांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार करावा.
- डॉ.यशवंत लांजेवार,
बालरोगतज्ज्ञ, भंडारा.