-तर पोटनिवडणुकीवर होणार परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:35 PM2018-02-10T23:35:08+5:302018-02-10T23:35:32+5:30
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजपने राज्यात सत्ता मिळविली. आता मात्र या मुद्याकडे दुर्लक्ष करून विदर्भवासीयांची दिशाभूल करण्यात येत आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजपने राज्यात सत्ता मिळविली. आता मात्र या मुद्याकडे दुर्लक्ष करून विदर्भवासीयांची दिशाभूल करण्यात येत आहे. याचे परिणाम पुढे होणाºया भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक व त्यानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत दिसून येतील. असा ईशाराच भाजपचे आमदार डॉ.आशिष देखमुख यांनी दिला.
विदर्भ आत्मबळ यात्रा शुक्रवारला भंडाऱ्यात आली असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दुर्वास धार्मिक, अॅड.पद्माकर टेंभुर्णीकर, संजय मते उपस्थित होते. यावेळी आ.देशमुख म्हणाले, भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. गोसेखुर्द व बावनथडीसारखे मोठे सिंचन प्रकल्प असूनसुद्धा येथे सिंचनाचा प्रश्न आहे. नहरांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. सिंचनासाठी अधिग्रहित जमिनीचा मोबदला शेतकºयांना मिळाला नाही. माजी मालगुजारी तलाव असले तरी दुरूस्ती व गाळामुळे सिंचन क्षमता कमी झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात धान व सोयाबीन प्रमुख पिके आहेत. दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. कर्जबाजारी शेतकºयांचा कुणी वाली नाही. एमआयडीसीमधील बरेचसे प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भाजपने लहान राज्यांच्या निर्मितीचे समर्थनच केले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ जनमत जाणून घेण्याच्या उद्देशाने विदर्भात अमरावती, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ येथे सार्वजनिक मतदान घेण्यात आले. ९५ टक्के जनतेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ मतदान केले होते. सर्वांगिण विकासासाठी विदर्भातील जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘सत्तेत आल्यास वेगळे विदर्भ राज्य निर्माण करू’ असे असे जाहिरनाम्यात म्हटले होते. त्यामुळे विदर्भातील ४४ जागा भाजपने जिंकून सत्तेवर आली. परंतु आता विसर पडला आहे.