निकालासह शाळांची प्रवेश प्रक्रियाही रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:45+5:302021-05-22T04:32:45+5:30
मोहाडी - कोरोना संकटाने पहिली ते आठवी विद्यार्थी घरीच बसून पास होणार आहेत. तर नववीच्या विद्यार्थ्यांचे स्थानिक शाळा ...
मोहाडी - कोरोना संकटाने पहिली ते आठवी विद्यार्थी घरीच बसून पास होणार आहेत. तर नववीच्या विद्यार्थ्यांचे स्थानिक शाळा आपल्या पातळीवर मूल्यमापन करणार आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांचे निकाल अद्यापही तयार झाले नाहीत. त्यामुळे निकालाचे प्रगतिपुस्तक लॉकडाऊननंतर व शाळा सुरू झाल्यावरच विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
पहिली ते आठवी विद्यार्थी तसेच नववीतील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बढती मिळणार आहे. मात्र, कोरोनाच्या प्रभावाने शिक्षकांना निकाल तयार करणे, विद्यार्थ्यांना निकालाची प्रत देणे ही प्रक्रिया करायला उशीर लागणार आहे. शाळा बंदमुळे पहिली, पाचवी, आठवी, नववी आदी वर्गाची प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिक्षकांना प्रभावित केले. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली. तरीही धास्ती कायम आहे. शाळा सुरू करण्याचे कोणतेही शासन, प्रशासनाचे आदेश नाहीत.
गत वर्षापासून कोरोनामुळे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा खोडा निर्माण झाला आहे. शाळांची संख्या जास्त, वर्गतुकड्यांची झालेली घट यामुळे दरवर्षी शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यामुळे नोकरी अबाधित राहावी म्हणून पालकांच्या दारी शिक्षक जात आहेत. नवीन विद्यार्थ्यांच्या भरतीसाठी शिक्षकांना एप्रिल, मे, जून या महिन्यांत उन्हाळा अंगावर काढावा लागत होता. कोरोनामुळे हा प्रवेश प्रक्रियेचा आटापिटा थांबला आहे. तरीही विद्यार्थ्यांच्या भरतीची चिंता अन् कोरोनाच्या भीतीने शिक्षकांचा जीव घुसमळत आहे.
बॉक्स
दहावी-बारावीचे विद्यार्थी चिंतित
सर्वांत जास्त चिंता दहावी, बारावीत असणाऱ्या विद्यार्थी, पालकांना सतावत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेचा विषय तळ्यात - मळ्यात चालत आहे. आता तर दहावीच्या परीक्षेचा विषय न्यायालयात गेला आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दहावीचे विद्यार्थी-पालक तसेच शिक्षकांना चिंतित राहावे लागणार आहे. किती अभ्यास करावा, असा प्रश्न आता विद्यार्थी पालकांना विचारत आहेत.