सेवानिवृत्त सीआरपीएफ जवानाचा ट्रेलरखाली दबून मृत्यू
By युवराज गोमास | Published: June 30, 2023 04:44 PM2023-06-30T16:44:25+5:302023-06-30T16:47:47+5:30
बेला येथील राष्ट्रीय महामार्गावरील हल्दीराम शॉप समोरील घटना
भंडारा : नागपूर येथील कर्तव्यावर जात असलेल्या एका सेवानिवृत्त सीआरपीएफ जवानाचा ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बेला येथील हल्दीराम शॉप समोर शुक्रवारला (३० जून) दुपारी १:३० वाजताचे सुमारास घडली.
मृतक जवानाचे नाव राजेश गोपीचंद पचघरे, (५१) रा. पांजरा-बोरी, ता. मोहाडी, असे आहे. मोहाडी तालुक्यातील पांजरा-बोरी येथील राजेश पचघरे हे सेवानिवृत्त सीआरपीएफ जवान होते. सध्या ते नागपूर येथील निरी येथे कर्तव्यावर होते. कुटुंबासोबत एक दिवसाची सुट्टी घालविण्यासाठी ते नेहमीप्रमाणे पांजरा येथे आले होते. शुक्रवारला नागपूर येथे कर्तव्यावर हजर होण्यासाठी ते दुचाकीने निघाले होते.
राष्ट्रीय महामार्ग ५३ वरून जात असतांना अपघातातील ट्रेलरही नागपूरकडे जात होता. दरम्यान बेला येथील हल्दीराम शॉप येथे जाण्यासाठी समोरून एका वाहन चालकाने वाहन वळविले. त्यावेळी राजेशने वाहनाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता वाहनावरील नियंत्रण सुटले. दुचाकी बाजुला पडली तर राजेश ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली दाखल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती हल्दीराम शॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.
घटनेची माहिती होताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. मृतदेह उचलून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामचंद्र भोयर, शिपाई राजेंद्र लांबट करीत आहेत.
करडी परिसरात हळहळ
घटनेची माहिती होताच करडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राजेश पचघरे यांचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. शनिवारला सकाळी १० वाजताचे सुमारास पांजरा-बोरी येथील स्मशानभूमीत त्यांचे पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.