अपंग कर्मचाऱ्यांची फेरतपासणी करा
By admin | Published: May 27, 2016 12:56 AM2016-05-27T00:56:14+5:302016-05-27T00:56:14+5:30
केंद्र शासन व राज्य शासनाकडून अपंग दिव्यांग कर्मचाऱ्यांना विविध सूट व सवलती देण्यात येतात.
जिल्ह्यात अनेक बोगस अपंग कर्मचारी : काशिनाथ ढोमणे यांची मागणी
भंडारा : केंद्र शासन व राज्य शासनाकडून अपंग दिव्यांग कर्मचाऱ्यांना विविध सूट व सवलती देण्यात येतात. मात्र याचा लाभ खऱ्या अपंग कर्मचाऱ्यांना मिळण्यापेक्षा बोगस अपंगांना मिळत आहे. कुठल्याही प्रकारचे अपंगत्व नसताना अनेक कर्मचारी बोगस अपंगत्वाचे सर्टिफिकेट मिळवून त्या आधारे अपंग कर्मचारी म्हणून लाभ घेत आहेत. यामुळे खऱ्या अपंग कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.
परिणामत: खऱ्या अपंगांना लाभ मिळण्यासाठी सर्व अपंग कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बोर्डाकडून फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी, कर्मचारी संघटनेचे राज्य संचालक काशिनाथ ढोमणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व अपंग आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
अपंग कर्मचारी यांना शासनाने अपंग वाहतूक भत्ता, व्यवसायकरातून सुट, पदोन्नतीत ३ टक्के आरक्षण, नियुक्तीत ३ टक्के आरक्षण, बदली मध्ये सुट व सवलती, निवडणूक कामातून सुट यासारख्या विविध सोयी-सवलती लागू केल्या आहेत. या सवलती खऱ्या व नैसर्गीक अपंगांना मंजूर करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी, कर्मचारी संघटना मुंबईच्या वतीने सतत प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या सहा-सात वर्षापासून शंकास्पद व बोगस अपंग कर्मचारी यांचे प्रमाण अचानक वाढले आहेत.
शासनाने सन २०१२ मध्ये अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील १ भाग मधील तरतुदीनुसार अपंग कर्मचारी, शिक्षक यांना प्रशासकीय बदली व समायोजन प्रक्रियेतून सूट दिल्याने या संधीचा फायदा घेवून जिल्ह्यातील कर्णबधीर, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग अपंग शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र अचानकपणे काढून जिल्हा परिषदमध्ये धुमाकूळ माजविलेला आहे.
या अपंगामुळे खऱ्या नैसर्गीक अस्थिव्यंग, अंध, अल्पदृष्टी, कर्णबधीर प्रवर्गातील अपंगांना त्रास होत आहे. कोणतेही अपंगत्व नसताना बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नती सुद्धा मिळविली आहे. जिल्ह्यात सुमारे २०० ते २५०० बोगस अपंग शिक्षक, कर्मचारी या संधीचा फायदा घेत आहेत. ( प्रतिनिधी)