तुडतुड्याची मदत मुख्यमंत्र्यांना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:35 PM2018-12-19T22:35:35+5:302018-12-19T22:35:55+5:30
तुटपुंजी रक्कम : किरमटीच्या शेतकऱ्याने केली मनीआॅर्डर, गतवर्षी झाले होते शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : शासनाकडून ...
तुटपुंजी रक्कम : किरमटीच्या शेतकऱ्याने केली मनीआॅर्डर, गतवर्षी झाले होते शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शासनाकडून धान पिकावर आलेल्या तुडतुड्याची तुटपूंजी मदत प्राप्त झाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर करुन मदत परत पाठविली. लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील शेतकऱ्यांने ही मनीआॅर्डर केली असून तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
लाखांदूर तालुक्यात गतवर्षी धानपिकावर मोठ्या प्रमाणात तुडतुड्याचे आक्रमण झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान शासनाकडून नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर झाली. हेक्टरी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अलीकडे मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. ही रक्कम अत्यंत तुटपूंजी असल्याने शेतकरी संतप्त होत आहे. यातूनच किरमटी येथील अल्पभूधारक शेतकरी जयपाल प्रकाश भांडारकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या नावाने स्थानिक पोष्टातून मनीआॅर्डर करुन मदत नाकारली.
जयपाल भांडारकर यांच्याकडे २ हेक्टर १६ आर जमीन आहे. गतवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली. अशा परिस्थितीत जयपालने आटापीटा करुन रोवणी केली. दरम्यान धानावर खोडकिडा, मावा, तुडतुडा आदी किडींनी आक्रमण केले. त्यात त्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.
जयपाल भांडारकर यांना सुध्दा लाभ मिळाला. विरली बुज साझाचे तलाठ्याने तुडतुड्याची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचे सांगितले. त्यावरुन जयपाल याने लाखांदूरच्या बँक आॅफ इंडियात चौकशी केली. तेव्हा त्यांच्या खात्यात १.१६ आर जमीनीचे फक्त ३ हजार ३७५ रुपये जमा झाल्याचे दिसून आले.
शासनाने जाहीर केलेल्या निकषानुसार बँक खात्यात सुमारो सात हजार रुपये जमा होणे अपेक्षित होते. मात्र तुटपूंजी रक्कम जमा झाल्याने जयपाल संतप्त झाला. त्याने थेट लाखांदूर येथील पोस्ट आॅफीस गाठून ३ हजार ३७५ रुपयांची मनिआॅर्डर मुख्यमंत्र्यांच्या नावाने केली. तसेच लाखांदूरचे तहसीलदार संतोष महल्ले यांनाही निवेदन दिले.
मिळाले तेवढ्यात समाधानी राहा
आपल्या खात्यात रक्कम कमी आल्याचे दिसताच जयपाल भांडारकर यांनी तलाठी कार्यालय गाठले. तेथील तलाठ्याला याबाबत जाब विचारला तेव्हा तलाठ्याने ‘जेवढे पैसे मिळाले, तेवढ्यातच समाधानी रहा,’ असे उत्तर दिले. या उत्तराने जयपाल संतप्त झाला. जयपालसारखीच स्थिती लाखांदूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची आहे.
लाखांदूर तालुक्यातील शेतकरी संतप्त
शासनाने धानावरील तुडतुड्याची मदत जाहीर केली. मात्र ही मदत अतिशय तोकडी असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सर्वेक्षणातील चुकांमुळे अनेकांना अपूरी मदत मिळत आहे. अनेक शेतकरी बँक खात्यात जमा झालेली रक्कम पाहून संताप व्यक्त करीत आहेत. या शेतकºयांना घोषित केल्यानुसार मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गतवर्षीची मदत आधीच वर्षभर उशिरा आली आणि त्यातही तुटपूंजी असल्याने अनेक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत आहे.