पोलिसांच्या मध्यस्थीने विकलेली शेतजमीन परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:43 AM2021-02-05T08:43:26+5:302021-02-05T08:43:26+5:30
दुधराम बुरडे (५०) रा.खैरीख असे फसवणूक झालेल्या गतिमंद शेतकऱ्याचे नाव आहे. माहितीनुसार, घटनेतील गतिमंद शेतकऱ्याची खैरी येथे एक एकर ...
दुधराम बुरडे (५०) रा.खैरीख असे फसवणूक झालेल्या गतिमंद शेतकऱ्याचे नाव आहे.
माहितीनुसार, घटनेतील गतिमंद शेतकऱ्याची खैरी येथे एक एकर मालकी शेतजमीन आहे. सदर शेतजमिनीत संबंधित शेतकऱ्याचे कुटुंबीय नियमित पीक उत्पादन घेत आहेत; मात्र गावातीलच एका ठगाने घटनेतील गतिमंद शेतकऱ्याला घरकुल मंजूर करून देण्याची बतावणी करून चक्क लाखांदूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घेऊन जात शेतजमिनीची विक्री केली.
सदर विक्री आंतर तालुक्यातील एका शेतकऱ्याला जवळपास तीन लक्ष रुपयात केली. या सबंध गैरप्रकाराची माहिती कुटुंबीयांना होताच शेतकऱ्याच्या पत्नीने लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून येथील ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे यांनी या सबंध घटनेची चौकशी केली. यावेळी चौकशीत त्या शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे आढळून आले. शेतजमीन पूर्ववत संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या नावे करून देण्याची समज दिली. त्यानुसार खरेदीकर्त्या शेतकऱ्याने सदर शेतजमीन पूर्ववत गतिमंद शेतकऱ्याच्या नावे करून दिली; मात्र या घटनेत खरेदीकर्त्या शेतकऱ्याने शेतजमीन खरेदीसाठी दिलेले तीन लक्ष रुपये या घटनेतील ठगाने घेतले असल्याने या प्रकरणात पैसे वसुलीवरून वाद निर्माण होण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.