आॅपरेशन थिएटरमधून पाठवितात रुग्णांना परत
By admin | Published: February 3, 2015 10:49 PM2015-02-03T22:49:22+5:302015-02-03T22:49:22+5:30
सर्वसामान्यांचा दवाखाना अशी ओळख असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात अस्थिरूग्णांची महिनाभरापासून हेळसांड होत आहे. रूग्णालय प्रशासनाकडून अस्थिरूग्णांची थट्टा सुरु आहे.
भंडारा : सर्वसामान्यांचा दवाखाना अशी ओळख असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात अस्थिरूग्णांची महिनाभरापासून हेळसांड होत आहे. रूग्णालय प्रशासनाकडून अस्थिरूग्णांची थट्टा सुरु आहे. शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रूग्णांना आॅपरेशन थिएटरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना भूलतज्ज्ञ व साहित्य नसल्याचे सांगून परत वॉर्डात पाठविण्याचा जिवघेणा प्रकार सुरू आहे. हा प्रकार माहित होताच सदर प्रतिनिधीने रुग्णालयात भेट दिली असता रूग्णांनी कैफियत मांडली.
भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील रूग्ण उपचारासाठी येतात. सामान्य रूग्णालय परवडण्याजोगे असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक शासकीय रूग्णालयात धाव घेतात. येथे तिसऱ्या माळ्यावर वॉर्ड क्रमांक १५ मध्ये अस्थिरूग्ण विभाग आहे. या विभागात सामान्य रूग्णालय प्रशासनाने रूग्णांसाठी १२ खाटांची व्यवस्था केली आहे. येथे उपचारासाठी दाखल काही रूग्ण महिनाभरापासून शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्यावर अद्याप शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही.
मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील श्रीराम उरकुडा खाटेकर यांच्या डाव्या पायाचे हाड मोडल्यानंतर ते ३ जानेवारीला रूग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांना लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, आता महिना लोटला तरीही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून मोडलेल्या हाडाला आधार रहावा, म्हणून पायात रॉड टाकावयाचा आहे. मात्र, सामान्य रूग्णालयात रॉड व बेशुध्दीचे इंजेक्शन देणारे तज्ज्ञ नसल्यामुळे त्यांना महिनाभरापासून दवाखान्यात पडून रहावे लागले आहे. त्यांच्या सेवेसाठी त्यांच्याजवळ मुलगा आहे. भंडारा येथे नातेवाईक राहत नसल्यामुळे भोजनाची गंभीर परिस्थिती त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे खासगी रूग्णालयात उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा रोजीरोटी सोडून वडिलांसोबत रूग्णालयात आहे. येथील अस्थिविभागाचे डॉक्टर त्यांना एक दिवसाआड शस्त्रक्रिया होईल, असे सांगत आहेत. मात्र, साहित्य व भूलतज्ज्ञाअभावी शस्त्रक्रिया लांबणीवर पडत आहे.
भंडारा तालुक्यातील आंबाडी येथील बलदेव दयाराम बावनकर हे वेटरचे काम करून आपल्या कुटूंबाचा गाडा हाकतात. त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पायात असलेला रॉड आता काढायचा आहे. यामुळे ते ५ जानेवारीला सामान्य रूग्णालयात दाखल झाले. याला महिना लोटत आहे. त्यांचीही तीच परिस्थिती आहे. येथील अस्थिरोग तज्ज्ञ त्यांना शस्त्रक्रियेची हमी देत असले तरी ते केव्हा होईल हे सांगत नाहीत.
यावेळी बलदेव म्हणाला, सोमवारला शस्त्रक्रिया करायचे असल्याचे डॉक्टरांनी सांगून आॅपरेशन थिएटरमध्ये नेले. शस्त्रक्रियापूर्वीचे कपडे घालायला सांगून आॅपरेशन टेबलवर झोपविले. तत्पूर्वी त्यांना सलाईन लावली. त्यानंतर बेशुध्दीचे इंजेक्शन देणारा व रॉड काढायचे साहित्य नसल्याचे सांगून आॅपरेशन न करताच तिसऱ्या माळ्यावरील वॉर्डात परत पाठविले. त्यांच्या पायातील रॉड १८ महिन्यात काढायला हवा होता, मात्र २४ महिन्यानंतरही रॉड काढण्यात आलेला नाही. महिनाभरापासून दवाखान्यात असल्यामुळे कुटूंबही आर्थिक संकटात सापडल्याचे सांगून बलदेव यांनी अश्रुंना वाट करुन दिली. (शहर प्रतिनिधी)