परतीच्या पावसाचा १३ हजार शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 07:00 AM2020-10-20T07:00:00+5:302020-10-20T07:00:14+5:30
Bhandara News, Agriculture भंडारा जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता शासकीय मदतीची आस आहे.
जिल्ह्यात यंदा एक लाख ७८ हजार ७६८ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे होते. जिल्ह्यात ७ ते ११ आॅक्टोंबर या कालावधीत परतीचा पाऊस कोसळला. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेला धान ओला झाला. कापूण ठेवलेल्या कळपा भिजून पिकाचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी कळप्यांना आता कोंब फूटत आहे. जिल्ह्यातील ५७५ गावांना या पावसाचा जबर फटका बसला. नऊ हजार ५४२ हेक्टरवरील पीक बाधित झाले. भंडारा तालुक्यातील ३५ गावातील ५८७ शेतकऱ्यांचे १९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.
मोहाडी तालुक्यातील ७७ गावातील २०२८ शेतकऱ्यांचे १०६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. तुमसर तालुक्यातील ८१ गावातील ५६४ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून ३४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. पवनी तालुक्यातील १४९ गावातील सहा हजार ९४२ शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला. तालुक्यात ५५५४ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. साकोली तालुक्यातील ९६ गावातील २०५ शेतकऱ्यांचे २५८ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. साकोली तालुक्यातील ९८ गावातील २०१३ शेतकऱ्यांचे १५५० हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाले. लाखांदूर तालुक्यातील ३९ गावातील ८२० शेतकऱ्यांचे ५७५ हेक्टरवरील पीक पावसाने बाधित झाले.
महापुरानेही अनेक गावातील पीक उद्ध्वस्त झाले होते. त्यातून सावरत नाही तोच आता परतीच्या पावसाने तडाखा दिला. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार जिल्ह्यात धान पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. ३३ टक्क्यावर सहा हजार हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसाने नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ३३ टक्क्याच्यावर सहा हजार ५५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात झाले असून ३३ टक्केच्यावर ४३०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सहा हजार ९४२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. कृषी विभागाच्यावतीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी अपेक्षा होत आहे.