परतीच्या पावसाने मातीमोल धान पिकांचे पंचनामे सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:49+5:30
तालुकानिहाय दररोज तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून दैनंदिन अहवाल मागितले जात असून पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. तरी देखील विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पीक नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सर्व यंत्रणांच्या मदतीने अद्यापही सुरू आहे. भंडारा तालुक्यात मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषीमित्र व गावचे स्थानिक पदाधिकारी यांच्या मदतीने नुकसान झालेल्या धानपिकाची माहिती घेतली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने मंडळनिहाय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार अनेक शेतकऑच्या शेतावर जावून नुकसानीची पाहणी करण्यात आली.
तालुकानिहाय दररोज तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून दैनंदिन अहवाल मागितले जात असून पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. तरी देखील विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पीक नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सर्व यंत्रणांच्या मदतीने अद्यापही सुरू आहे.
भंडारा तालुक्यात मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषीमित्र व गावचे स्थानिक पदाधिकारी यांच्या मदतीने नुकसान झालेल्या धानपिकाची माहिती घेतली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यात अंदाजे आठ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज असून अनेक ठिकाणी शेतकरी भरपाई मिळण्यासाठी मदतीची मागणी करीत आहेत.
भंडारा तालुक्यातील ३८ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकºयांचे पंचनामे करण्यात आले.हे पंचनामे तातडीने आठ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावयाचे होते.
पाहणीदरम्यान उपसंचालकांसह उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, उपविभागीय कार्यालयातील तंत्रज्ञ अधिकारी गायधने यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्यानुसार नुकसानीचे पंचनामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याची माहिती कृषी अधिकारी मिलींद लाड यांनी दिली. एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरु असल्याने पंचनामे करूनही धान उत्पादक शेतकºयांना मदत कधी मिळणार, याकडे देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
खरीप हंगामवर ओढावणार संकट
यावर्षी खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने ओढ दिली. तर त्यानंतर सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात पावसाची संततधार सुरू राहिल्याने अतिवृष्टीनेही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यातच अंतिम टप्प्यात धान कापणीला आले असता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे.
आयुक्त उपसंचालकांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी आयुक्त कार्यालयातील उपसंचालकांनी बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अनेक नुकसानग्रस्त गावांना भेटी देत कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचारी,पिकविमा कंपनी व जिल्हा यंत्रणेच्या मदत घेतली. बळीराजावर मोठे संकट ओढवले असून त्याला नुकसान भरपाईची नितांत गरज आहे. सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे अनेक शेतकऱ्यांनी धान, तूर, सोयाबीनमोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु या पिकावरही किडींचे मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांवरचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच परतीच्या पावसाने धान पिकाचे होत्याचे नव्हते केले. यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भरीव मदत करावी, अशी मागणी होत आहे.