वर्षभरात १० कोटींचा महसूल
By admin | Published: September 7, 2015 12:51 AM2015-09-07T00:51:20+5:302015-09-07T00:51:20+5:30
पवनी तहसील विभागातील महसूल विभागाने वर्षभरात जवळपास १० कोटींचा महसूल प्राप्त केला.
पालोरा (चौ) : पवनी तहसील विभागातील महसूल विभागाने वर्षभरात जवळपास १० कोटींचा महसूल प्राप्त केला.
दोन महिन्यांपूर्वी रेतीची चोरीने वाहतूक करणारे ३३ ट्रक निलज फाट्यावर पकडण्यात आले होते. यात क्षमतेपेक्षा जास्त रेती, रॉयल्टी न घेता रेती चोरीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. ३१ ट्रक जप्ती म्हणून पवनी आगारात जमा केले तर दोन ट्रक निलज फाट्यावर उभे आहेत. यात महसूल विभागाने ३३ ट्रक चालकाकडून १० लाख २० हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर पवनी आगाराकडून जागेसहीत देखरेख खर्च म्हणून प्रति दिवस २०० रुपये प्रमाणे ५० दिवसात २० ट्रक चालकाकडून २ लाख वसूल केले आहे. पुन्हा ११ ट्रक जमा आहेत. ते गेल्यावर जवळपास २ लाखाच्या वर फायदा मिळण्याची शक्यता आहे. वैनगंगा रेतीची विदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यावर्षी ७ घाटापैकी ६ घाटाचा लिलाव प्रशासनकडून करण्यात आला आहे. मात्र रेतीमाफियाकडून महसूल विभागाच्या डोक्यात धुळ टाकून रेतीघाटावर जाण्याकरिता अनेक चोरीचे रस्ते तयार करण्यात आले आहे. या चोरीच्या मार्गाने रात्रभर ट्रॅक्टरद्वारे रस्त्यावर रेतीचा ट्रक जमा केला जातो व जेसीबी लावून रेती ट्रकमध्ये भरून बाहेर जिल्ह्यात विक्रीकरिता पाठविले जाते. यामुळे प्रशासनाला लक्षावधी रुपयाचा चुना लागत आहे. (वार्ताहर)