रेती तस्करीला महसूल, पोलिसांचा आशीर्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:04 PM2019-02-19T22:04:14+5:302019-02-19T22:06:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकाही रेती घाटांचा लिलाव झाला नाही तरी नदीपात्रातून सर्रास रेतीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकाही रेती घाटांचा लिलाव झाला नाही तरी नदीपात्रातून सर्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे. रेतीची चोरी येथे महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू आहे. संपूर्ण यंत्रणा रेती माफियांच्या पाठीशी उभी असल्याची चर्चा आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सर्वात नद्यांच्या घाटातून सध्या रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. रेती घाटांचा लिलाव महसूल प्रशासनाने केला नाही. यामुळे बेसुमार रेतीचा उपसा सुरू आहे. यामुळे पर्यावरणाला येथे धोका निर्माण झाला आहे. पाणी समस्येत वाढ झाली आहे. दररोज शेकडो ट्रॅक्टर नदी पात्रातून रेती वाहून नेतानी दिसतात. रस्त्यावर शेकडो रेतीचे ट्रक धावतांनी दिसतात. येथे रेती तस्करीला महसूल व पोलीस प्रशासनाचा आशिर्वाद आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सुमारे १०० किमी नदीचा प्रवास आहे. दरम्यान येथील रेती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. पांढरी शुभ्र दाणेदार रेतीला नागपूर येथे प्रचंड मागणी आहे. रेतीघाट लिलावाचा कार्यकाळ संपला आहे. मागील दोन महिन्यांपासून सर्रास रेतीचे नदी पात्रातून उत्खनन सुरू आहे. रेती वाहतुकीदरम्यान मध्यप्रदेशातील चोरट्या टीपीचा वापर केला जातो. एक मोठे रॅकेट सक्रीय आहे. सदर रॅकेटला कुणीच उद्वस्त करू शकत नाही, अशी मुजोरी सध्या दोन्ही जिल्ह्यात रेती माफिया करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने सर्रास रेतीची तस्करी सुरू असल्याचा आरोप होत आहे.