रेतीचा ट्रॅक्टर जप्त झाला, चालकाने पळवून नेला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 12:29 PM2023-03-04T12:29:45+5:302023-03-04T12:30:00+5:30

जिल्ह्यात रेती तस्कर सक्रीय : मोहाडी, लाखांदूरमध्ये कारवाई, लक्ष महसूल विभागाच्या कारवाईकडे

Revenue team seizes sand smuggling tractor; driver run away the seized tractor from the Tehsil office | रेतीचा ट्रॅक्टर जप्त झाला, चालकाने पळवून नेला

रेतीचा ट्रॅक्टर जप्त झाला, चालकाने पळवून नेला

googlenewsNext

लाखांदूर (भंडारा) : बांधकाम साहित्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेतीची तस्करी जिल्ह्यात जोरात सुरु झाली आहे. प्रशासनाने त्यांच्या मुसक्या - आवळण्यासाठी कारवाया सुरु केल्या असल्या तरी या तस्करांची हिंमत बरीच वाढलेली आहे. जप्त केलेल्या रेंतीचा ट्रॅक्टर ऐन तहसील कार्यालयातून पळवून नेण्यापर्यंत त्यांची मजल वाढल्याने आता महसूल विभाग नेमकी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लाखांदूर आणि मोहाडी तालुक्यात महसूल विभागाने कारवायांची मोहीम उघडली आहे. गेल्या आठवड्यात तीन टिप्पर जप्त केल्यानंतरही तस्करांकडून रेतीचा उपसा सुरूच आहे. लाखांदूर येथे सकाळच्या सुमारास कर्तव्यावरील महसूल विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी विना रॉयल्टी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रंगेहाथ पकडून पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा केला. मात्र चक्क ट्रॅक्टर चालकाने तहसील कार्यालयाच्या मागील भागातून तहसील कार्यालय परिसरात पोहोचत चक्क रेतीने भरलेला ट्रॅक्टर पळविल्याची घटना घडली. 

ही घटना ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर येथील तहसील कार्यालय परिसरात घडली. या घटनेत लाखांदूरचे नायब तहसीलदार देविदास पाथोडे यांच्या तक्रारीवरून मेहरबान प्रभाकर बारसागडे (२३) रा. कऱ्हांडला यांच्या विरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर महसूल विभागातील तलाठी संजय मेश्राम, शैलेंद्र बिसेन व दिनेश सिडाम यासह अन्य अधिकारी कर्मचारी लाखांदूर तालुक्यात पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग करीत असताना महसूल पथकाला राजनी ते कऱ्हांडला मार्गावर एक स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा १ ब्रास रेती भरलेला विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली दिसून आली.

कार्यालयामागून येवून साधला डाव

यावेळी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले व रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यावेळी त्याच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्याने महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रेती चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करून पुढील कार्यवाहीसाठी रेतीने भरलेला ट्रॅक्टर स्थानिक लाखांदूर येथील तहसील कार्यालयात जमा केला होता. रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर जवळ तहसीलचे कनिष्ठ लिपिक उभे असतानाच तहसीलच्या मागेहून आलेल्या घटनेतील आरोपी ट्रॅक्टर चालक मेहरबान प्रभाकर बारसागडे यांनी ट्रॅक्टरवर चढत तहसील कार्यालयातून रेतीने भरलेला ट्रॅक्टर पळविला. ही घटना नायब तहसीलदार देविदास पाथोडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ लाखांदूर पोलिस ठाणे गाठत ट्रॅक्टरचालका विरोधात तक्रार दिली.

सूर नदीघाटावर तीन ट्रॅक्टर जप्त

मोहाडी तालुक्यातील सूर नदीच्या पिंपळगाव(झं) रेती घाटावरून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर शुक्रवारी सकाळी महसूल पथकाने दंडात्मक कारवाई करून हे तिन्ही ट्रॅक्टर मोहाडी पोलीस स्टेशन येथे जमा केले. रेती चोरीवर आळा घालण्यासाठी तहसीलदार दीपक कारंडे यांनी विशेष पथक तयार केले आहे. आठ दिवसांपूर्वी दोन टिप्पर तर २५ फेब्रुवारी रोजी तीन टिप्पर जप्त करण्यात आले होते. या कारवाईमुळे रेती चोरात धडकी भरली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे नायब तहसीलदार मोरेश्वर हुकरे यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी अनिल तागडे, मांडेसरच्या महिला तलाठी निरू मदनकर व वडेगावच्या तलाठी मीरा शेंडे यांच्या पथकाने मोहाडी पोलिसांच्या मदतीने पिंपळगाव (झं.) रेती घाटावर धाड घातली. यावेळी लक्ष्मण आसाराम सपाटे, काजू रामभाऊ हजारे, व राकेश रामप्रसाद वैद्य (तिघेही रा. नेरी) यांचे ट्रॅक्टर विना परवाना नदीपात्रात रेती भरत असताना आढळले. चारही बाजूने सापळा रचला असल्याने त्यांना पळता आले नाही. या तिन्ही ट्रॅक्टर वर महसूल अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई करून ते मोहाडी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

घाटावर जावून तहसीलदारांनी केली कारवाई

विनापरवाना सहा ब्रास रेती वाहतूक करणारा टिप्पर तहसीलदार - दीपक कारंडे यांनी घाटावर जाऊन पकडला. गोपनीय माहितीनुसार महगावदेवी घाटातून रेती भरत असलेल्या टिप्पर क्रमांक एमएच ३६ जी -३३६५ची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार दीपक कारंडे यांनी आपल्या चमूतील मंडळ अधिकारी कुंभारे, महसूल सहायक चंदू भोंगाडे, कोतवाल चंद्रकुमार नंदनवार यांच्यासह जाऊन टिप्पर पकडला. टिप्पर जप्त करून पुढील दंडात्मक कारवाई करण्याकरिता मोहाडी येथील पोलिस स्टेशनमध्ये 'जमा करण्यात आला.

दरम्यान, सूर नदीच्या मोहगाव देवी रेती घाटावर २५ फेब्रुवारीला अवैध रेती भरून वाहतूक करणाऱ्या तीन टिप्परवर दंडात्मक कारवाई करून हे तिन्ही टिप्पर जप्त करण्यात आले होते. हे टिप्पर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या श्री स्वामी समर्थ इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनी पुणे यांच्या मालकीचे आहेत. ही कारवाई नायब तहसीलदार एम. एम. हुकरे, मंडळ अधिकारी आर. एस. मोहरकर व जे. डी. कुंभारे यांच्या पथकाने केली होती.

Web Title: Revenue team seizes sand smuggling tractor; driver run away the seized tractor from the Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.