अंगरक्षक पोलीस शिपायाने ताणले शेजारी महिलेवर रिव्हाॅल्वर; हवेत झाडल्या दोन फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 08:58 PM2021-11-01T20:58:09+5:302021-11-01T20:58:38+5:30
Bhandara News खासदारांचे अंगरक्षक असलेल्या एका पाेलीस शिपायाने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर बंदूक ताणल्याची घटना येथील तकीया वॉर्डात घडली. एवढेच नाही तर महिलेशी वाद घातल्यानंतर घरी परतल्यानंतर रागाच्या भरात शिपायाने हवेत दोन फैरी झाडल्या.
भंडारा : खासदारांचे अंगरक्षक असलेल्या एका पाेलीस शिपायाने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर बंदूक ताणल्याची घटना येथील तकीया वॉर्डात घडली. एवढेच नाही तर महिलेशी वाद घातल्यानंतर घरी परतल्यानंतर रागाच्या भरात शिपायाने हवेत दोन फैरी झाडल्या. रविवारी रात्री ही घटना घडल्यानंतरही तक्रार दाखल करून घेण्यास विलंब झाल्याने भंडारा शहर ठाणेदाराची तडकाफडकी बदली करण्यात आली.
सेवक तेजराम खंडाते असे पोलीस शिपायाचे नाव असून तो खासदार सुनील मेंढे यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत आहे. तकीया वॉर्डातील शांतीनगर येथे राहणारे रोशन दहेलकर यांच्या घरी रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सेवक खंडाते मद्यधूंद अवस्थेत पोहचला. त्यावेळी घरी असलेल्या पत्नी कुमूदिनी दहेलकर यांच्यावर आपली रिव्हाॅल्वर ताणली. त्याचवेळी सेवकची आई आणि पत्नी तेथे आली. त्यांनी त्याला घरी नेले. परंतु घरी परतताच रागाच्या भरात त्याने हवेत दोन फायर केले. घरातील सामानाची तोडफोड केली.
या घटनेनंतर रोशन आणि कुमूदिनी तक्रार देण्यासाठी भंडारा ठाण्यात पोहचले. परंतु रात्री १२ वाजेपर्यंत त्यांची तक्रारच दाखल करून घेतली नाही. हा प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना माहित होताच त्यांनी तात्काळ तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिले. सोमवारी दुपारी १ वाजता काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक जाधव यांची भेट घेतली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी थेट ठाण्यात पोहचले. पोलीस अधीक्षकांनीही ठाण्याला भेट देवून पाहणी केली. तसेच तात्काळ तक्रार नोंदवून घेण्याचे निर्देश दिले. पोलीस शिपायाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.
ठाणेदाराची तडकाफडकी बदली
दांम्पत्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी भंडारा शहरचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर पोलीस मुख्यालयातील दोषसिद्ध विभागाचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्याकडे भंडारा ठाण्याचा प्रभार देण्यात आला.