चुलबंदच्या तीरावर पिकते कारले, चवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:56 PM2018-12-07T21:56:04+5:302018-12-07T21:56:34+5:30
चुलबंद नदीच्या सुपीक खोऱ्यात आता शेतकरी धाना ऐवजी भाजीपाला पीक घेण्याकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतकºयांनी कारले आणि चवळीच्या पिकातून समृद्धीचा मार्ग धरला आहे. एकरी एक ते दीड लाख रूपयांचे उत्पन्न घेतले जात आहेत.
मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : चुलबंद नदीच्या सुपीक खोऱ्यात आता शेतकरी धाना ऐवजी भाजीपाला पीक घेण्याकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतकºयांनी कारले आणि चवळीच्या पिकातून समृद्धीचा मार्ग धरला आहे. एकरी एक ते दीड लाख रूपयांचे उत्पन्न घेतले जात आहेत.
लाखांदूर आणि लाखनी तालुक्यातून चुलबंद नदी वाहते. चुलबंदच्या खोऱ्यातील गाळाची सुपीक जमीन पाण्याचा निचरा करणारी आहे. परंतु या जमिनीवर आतापर्यंत केवळ धानाचेच पीक घेतले जात होते. धान पिकातून हवे तसे उत्पन्न मिळत नाही. सतत नापिकीचा सामना करावा लागतो. सर्वसाधन सामुग्री असतानाही कर्जबाजारीपणा नशीबी येतो. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा भाजीपाला पिकाकडे वळविला आहे.
चुलबंद नदीच्या खोऱ्यातील खोलमारा, मारेगाव, नरव्हा, वाकल, तावशी, खाऊशी आदी गावात गत दोन वर्षांपासून भाजीपाला पीक घेतले जात आहे. राज्यात भाजीपाल्याला भाव मिळत नसले तरी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र बीटीबी भाजी मंडीच्या माध्यमातून योग्य भाव मिळत आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी आता भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहे.
आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी या शेतकऱ्यांना कृषी विभागाची सातत्याने मार्गदर्शन मिळते. शेतकरी नवनवीन प्रयोग करून आता कारले आणि चवळी घेत आहे. खोलमारा येथील प्रयोगशील शेतकरी प्रमोद भुसारी यांनी आपल्या दीड एकरात कारले आणि चवळीची लागवड केली आहे. त्यातून त्यांना एकरी एक ते दीड लाख रूपयांचे कारले आणि एक लाख रूपयांच्या चवळीचे पीक झाले आहे. घरी खाण्यापुरता धान ते पेरतात. सर्व शेतात आता भाजीपाल्याचे पीक घेत असून गुणात्मक दर्जा वाढविण्यावरही त्यांचा भर आहे. खोलमाराचे सरपंच अमृत मदनकर म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीला जोड दिल्याने प्रगती साधने शक्य होत आहे. मलचिंग, सुक्ष्म सिंचन, कागदी आवरण, प्लॉस्टिक कॅरेट, गावाकरीता भाजीपाला, फिरते व्हॅन अशा सुविधा अनुदानावर किंवा शंभरटक्के सुटीवर पुरविल्यास खोलमारा राज्यात कृषी मॉडेल म्हणून पुढे येईल, असे सांगितले. कारले व चवळीच्या पिकाला जमिनीवर न ठेवता दोरी बांधून लटकवून ठेवले जाते. त्यामुळे फळांची जोमदार वाढ होते.
कॅपल्थॉन्ट पद्धतीचा वापर
भाजीपाला पीक रोगमुक्त राहण्यासाठी सुरूवातीच्या काळात कॅपल्थॉन्ट (कागदी आवरण) दिले जात आहे. चुलबंद खोऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हा प्रयोग केला आहे. यामुळे पीक लहान असताना त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. उन, वारा, पाऊस यापासूनही बचाव होतो. कमी श्रमात अपेक्षित उत्पादन मिळते.
शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील बदल स्विकारण्याची गरज आहे. त्यासाठी स्वत: अभ्यास करावा. बाजारपेठेचा अभ्यासही महत्वाचा आहे. कोणत्या हंगामात कोणते वाण घ्यावे हेही महत्वाचे आहे. खोलमारा येथून बीटीबीमध्ये कारले, चवळी, मोठ्या प्रमाणात येत असून येथील शेतकरी प्रयोगशिल आहे.
-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी भंडारा