भाताचे साकोली-९ वाण विकसित
By Admin | Published: June 22, 2017 12:30 AM2017-06-22T00:30:14+5:302017-06-22T00:30:14+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी संशोधन केंद्र साकोली येथून साकोली - ९ हे भाताचे नवीन वाण निर्माण करण्यात आले आहे.
कृषी संशोधन केंद्राचा उपक्रम : संयुक्त कृषी संशोधनाला मान्यता
शिवशंकर बावनकुळे । लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली. : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी संशोधन केंद्र साकोली येथून साकोली - ९ हे भाताचे नवीन वाण निर्माण करण्यात आले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे २९ ते ३१ मे ला झालेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीने सदर वाणास विदर्भ विभागातील ओलीताखालील क्षेत्रात खरीप हंगामात लागवडीसाठी शिफारस केली व मान्यता दिली आहे.
साकोली-९ हा मध्यम कालावधीचा म्हणजे पेरणीपासून १३० ते १३५ दिवसात कापणीस तयार होतो. या वाणाचे दाणे मध्यम बारीक असून उत्पादन ३८-४० असून अनुवंशिक उत्पादन क्षमता ५५ क्वि हे पर्यंत आहे. सदर भात वाण हा पिकेव्ही एचएमटी आणि किशोर या जातीच्या संकरातून निर्माण केला असल्यामुळे खाण्यास उत्तम आहे. यामध्ये अमायलोज प्रमाण २२.५५ टक्के म्हणजे मध्यम असल्यामुळे भात मऊ व मोकळा होतो. या वाणाचे मिलिंगचे प्रमाण जास्त म्हणजे ६८ ते ७५.८६ टक्के पर्यंत आहे. दिवसेंदिवस पूर्व विदर्भ विभागामध्ये किडी व रोगाचे प्रमाण भात पिकावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सदर नवीन वाण खोडकीडीचा साधारण प्रतिकारक आहे. तसेच गादमाशीचा प्रादुर्भाव सुद्धा आरपी ४-१४ व पिकेव्ही एचएमटी पेक्षा कमी प्रमाणात होतो.
याच बरोबर पानावरील करपा, मानमोडी पर्णकोष कुजल्या, टुंग्रो व तपकिरे ठिपके या रोगांना सुद्धा साधारण प्रतिकार करण्याची क्षमता इतर वाणापेक्षा जास्त असल्यामुळे दिवसेंदिवस फवारणीवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यास मदत होईल.
या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध असून प्रती शेतकऱ्यांना ३५ किलो प्रमाणे बियाणे मिळेल. तरी शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड खरीप हंगामात करावी.
-डॉ.जी.आर. श्यामकुंवर, वरिष्ठ भात पैदासकर तथा वाण संशोधक़