सामान्य माणसाला सेवा घेण्याचा अधिकार
By admin | Published: October 10, 2015 01:08 AM2015-10-10T01:08:35+5:302015-10-10T01:08:35+5:30
सामान्य माणसाला अधिक प्रभावी, पारदर्शक आणि तत्पर सेवा मिळावी यासाठी अनेक कायद्याच्या माध्यमातून शासन व प्रशासन पूर्वीपासून काम करीत आहेत.
अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण : सुनील धापटे यांचे प्रतिपादन
भंडारा : सामान्य माणसाला अधिक प्रभावी, पारदर्शक आणि तत्पर सेवा मिळावी यासाठी अनेक कायद्याच्या माध्यमातून शासन व प्रशासन पूर्वीपासून काम करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामुळे सामान्य माणसाला सेवा देण्यासाठी प्रशासन स्वत:वर बंधन घालून घेतेय, असा या कायद्याचा अर्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन यशदाच्या राज्य प्रशिक्षण मुल्यमापन यंत्रणचे संचालक डॉ. सुनील धापटे यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्याची माहिती सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होण्यासाठी प्रशिक्षकांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. शासकीय अध्यापक विद्यालयात आयोजित या प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना धापटे बोलत होते.
यावेळी यशदाचे प्रशिक्षक घनशाम महाजन, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभय परिहार उपस्थित होते.
शासकीय कामात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असावे त्यासाठी शासनाने दप्तर दिरंगाई, नागरिकांची सनद, विलंबाचा कायदा अशा कायद्याच्या व निर्णयाच्या माध्यमातून जनतेला वेळेत आणि प्रभावीपणे सेवा मिळवून घेण्याचा अधिकार दिला. मात्र, शासनाने २८ एप्रिल २०१५ रोजी लागू केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम या नवीन कायद्याव्दारे आता जनतेला वेळेत सेवा उपलब्ध करुन देणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना बंधनकारक झाले आहे. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करुन त्यासाठी नियत कालमर्यादा घोषित करणे बंधनकारक आहे. दिलेल्या नियत कालमर्यादेत पात्र व्यक्तीला सेवा न दिल्यास पात्र व्यक्तीस अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपिल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करतांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दंड बसणार नाही याची काळजी घेवून सामान्य जनतेला वेळेत सेवा पुरवाव्यात, असे आवाहन धापटे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, दिलीप तलमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी रवंीद्र देवतळे, गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर, महिला व बालकल्याण अधिकारी मनीषा आंबेडारे तसेच सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)