तुमसरातील वाढती गुन्हेगारी नव्या पोलिस अधीक्षकांच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:44 PM2024-09-10T12:44:55+5:302024-09-10T12:45:40+5:30
तालुक्यात ठिय्या : कर्मचारी अलर्ट मोडवर, गुन्हेगारांची घेतली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर शहर व तालुका तसेच मोहाडी तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे शासन दप्तरी नोंद आहे. याची दखल नवीन पोलिस अधीक्षक नुरुल हुसेन यांनी घेतली आहे.
बुधवारी तुमसर व गोबरवाही येथे पोलिस ठाण्याला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची चर्चा केली. येथील गुन्ह्यांचा पोलिस अधीक्षकांनी आढावा घेतला असून, या तालुक्यात खून, रेती चोरी, मॅगनिज चोरी, गांजा व गो तस्करी अधिक आहे. यावर नवीन पोलिस अधीक्षक अधिक फोकस करीत असल्याचे समजते.
२०२३ मध्ये तीन खून व तीन हाफ मर्डर झाले होते, तर मध्ये जुलै-ऑगस्ट २०२४ पर्यंत तीन खून व आठ हाफ मर्डर झाले आहेत. २५ सप्टेंबर २०२३ मध्ये नईम शेख याची हत्या गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर झाली होती. त्यांची हत्या ही टोळीयुद्धातून झाली होती. मागील एक वर्षात तुमसर शहरात एकही खून झाला नाही. याची दखलही पोलिस अधीक्षकांनी घेतली.
"तुमसर शहर तसेच तुमसर, आंधळगाव, सिहोरा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मागील दीड वर्षात तुमसर शहरवगळता गुन्हे घडले. हे प्रमाण कमी झाले आहे. मागील दीड वर्षात शहरात एकही खून झाला नाही. क्राइम अगेंस्ट वुमन अंतर्गत मोहीम राबविण्यात आली आहे."
- रश्मिता राव, उपविभागीय पोलिस अधिकारी, तुमसर
गुन्हे वाढण्याची कारणे
रेती चोरी, टोळी युद्ध, मॅगनीज चोरी, गांजा तस्करी, गो तस्करी इत्यादी प्रकरणाची पार्श्वभूमी येथील गुन्ह्यांच्या वाढीमागे आहे. सिहोरा येथील एटीएम फोडणे, तुमसर शहरातील घरफोडी, आंधळगाव परिसरातील गुन्हे तसेच इतर गुन्ह्यांची माहिती येथे घेण्यात आल्याचे समजते.
गुन्हा करून आरोपी जातात पळून
तुमसर तालुका हे राज्याचे शेवटचे टोक असून, येथे गुन्हे करून मध्य प्रदेशात सहज पळून जाणे आरोपींना शक्य होते. तसेच रेल्वेने छत्तीसगड तसेच मुंबई - हावडा रेल्वेमागनि आरोपी सहज येथून पळून जातात.