जलशुद्धीकरण केंद्राला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 09:44 PM2018-07-20T21:44:33+5:302018-07-20T21:44:57+5:30
१३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरक्षा भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरूमाचे खनन करण्यात आले आहे. या अवैध खननामुळे जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात सापडले आहे. खनन असेच होत राहिले तर शुद्धीकरण केंद्र कधीही पडू शकते. याकडे मात्र वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : १३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरक्षा भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरूमाचे खनन करण्यात आले आहे. या अवैध खननामुळे जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात सापडले आहे. खनन असेच होत राहिले तर शुद्धीकरण केंद्र कधीही पडू शकते. याकडे मात्र वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
साकोली व लाखनी तालुक्यातील १३ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधीकरण विभागातर्फे कोट्यवधी रूपये खर्चून साकोली येथील गडकुंभली मार्गाला लागून असलेल्या टेकडीवर पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रातून पाणी शुद्ध होऊन ते दोन्ही तालुक्यातील गावांना पुरविण्यात येणार आहे. मात्र सदर केंद्राच्या सुरक्षा भिंतीला लागून अवैधरित्या मुरूमाचे मोठ्या प्रमाणात खनन होत आहे.
सदर उत्खनन करून पहाडीतील मुरूम व मिट्टीची उचल करण्यात आली आहे. भविष्यात या जलशुद्धी केंद्राची सुरक्षाभिंत व जलशुद्धीकरण केंद्र जमीनदोस्त होऊ शकते. सदर केंद्रात पाणी निम्न चुलबंद प्रकल्पातून जलवाहिनीव्दारे आणण्यात येते. ही जलवाहिनीसुद्धा याच टेकडीच्या कडेने नेण्यात आली आहे. ज्या ठिकाणाहून ही पाईप लाईन केली आहे मात्र या जलवाहिनीच्या बाजुनेही मोठ्या प्रमाणात खनन झाले आहे.
टेकडीचे सौंदर्य धोक्यात
साकोली सेंदुरवाफा या दोन्ही गावाचा मधात महामार्गाला लागून वनविभाग व महसूल विभागाची पहाडी आहे. या पहाडीमुळे साकोलीच्या सौंदर्यात भर पडली आहे. मात्र अवैधरित्या उत्खननामुळे या पहाड्याच्या सौंदर्यात धोका निर्माण झाले. यासंबंधी वनविभाग व महसूल विभाग २४ तास कार्यरत असतानाही अवैधरित्या उत्खनन होणे म्हणजे कुंपनच शेत खाते असे दिसून येत आहे.