नदी शुध्दीकरण उपाययोजना शून्य

By admin | Published: March 22, 2016 12:48 AM2016-03-22T00:48:14+5:302016-03-22T00:48:14+5:30

जलस्रोतांचे प्रदूषण हा गुन्हा आहे, असे असले तरी अनेक वर्षांपासून नागनदीचे घाण पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे.

River purification measures plan zero | नदी शुध्दीकरण उपाययोजना शून्य

नदी शुध्दीकरण उपाययोजना शून्य

Next

देवानंद नंदेश्वर भंडारा
जलस्रोतांचे प्रदूषण हा गुन्हा आहे, असे असले तरी अनेक वर्षांपासून नागनदीचे घाण पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठावरील अनेक गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्याची गरज असताना अनेक संघटना, पक्ष, लोकप्रतिनिधीकडून केवळ मागणी केली जात आहे. परंतु आजही उपाययोजना शून्य आहे. याला कारणभूत कोण, याकडे लक्ष न देता २२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त वैनगंगा स्वच्छतेसाठी सर्वानीच पुढाकार घेऊन शासन-प्रशासनाला बाध्य करण्याची काळाची गरज निर्माण झाली आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरु झाले असल्याने पाणी सिंचित राहू लागले आहे. नागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे.
धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे ३०-३५ किलोमीटर भंडारा-कारधापर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. पवनी व भंडारा येथे नगरपरिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. जरी फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठावर बरेच गावे आहेत. तेथील महिला पुरुष नदीच्या पाण्यात आंघोळ करतात. त्या दूषित पाण्यामुळे काही लोकांच्या अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे येणे आदी प्रकार दिसून येत आहेत. ग्रामपंचायतमार्फत याच नदीतील पाणी गावातील लोकांना पिण्यासाठी पुरविले जाते. फिल्टरची खास सोय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या दूषित पाण्यापासून धोका निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे प्रत्येकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनी परिसरात कावीळ रोगाचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. वैनगंगेच्या पाण्यात नाग नदीचे दूषित घाण पाणी जाऊ न देण्याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नागरिकांच्या आरोग्यास दिवसेंदिवस आजाराचा धोका निर्माण होत आाहे. संपूर्ण नदी पात्रातील साचलेले पाणी दूषित झाल्यामुळे मासोळ्यांचे उत्पादन घटले आहे. ढिवर समाज बांधवांच्या रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे.

लोकनेत्यांची मागणी अन् अधिकाऱ्यांचे प्रवचन !
नदीत येणारे नागनदीचे दुषित पाणी स्वच्छ करण्याविषयी वर्षभरापासून लोकनेत्यांकडून मागणी करण्यात येत आहे. तर अधिकाऱ्यांकडून पाणी बचतीसह उपाययोजना करण्याचे प्रवचन देण्यात येत आहे. कन्हान, सुर, बावनथडी, चुलबंद आणि वैनगंगा या पाच नद्यांच्या पाण्याचे पूजन करुन ते वैनगंगा नदीत सोडण्याने पाणी बचत व नदीतील घाण शुध्द होणार नाही. जलप्रतिज्ञा, वैनगंगा स्त्रोत्र पठन केल्याने दूषित पाण्यामुळे होणारे आजार पळणार नाही. पाणी बचत व नदीतील घाण शुध्द करण्यासाठी प्रबळ उपाययोजनेची गरज आहे. अंमलबजावणीनंतरच जिल्हावासीयांना 'अच्छे दिन'ची विश्वासार्हता जाणवेल.

Web Title: River purification measures plan zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.