रेतीमुळे रस्ता बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:38 PM2017-11-07T23:38:33+5:302017-11-07T23:38:49+5:30
डोंगरला-नवरगाव रस्त्यावर डम्पिंग केलेली रेती महसूल प्रशासनाने भूईसपाट केली. सध्या हा रस्ता ये-जा करण्यास धोकादायक ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : डोंगरला-नवरगाव रस्त्यावर डम्पिंग केलेली रेती महसूल प्रशासनाने भूईसपाट केली. सध्या हा रस्ता ये-जा करण्यास धोकादायक ठरला आहे. दुचाकी स्वारांना या रस्त्यावरून दुचाकी चालविणे शक्य नाही. महसूल प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. डोंगरला गावातही ठिकठिकाणी रेतीचे ढीग होते. महसूल प्रशासनाने ती रेतीही भुईसपाट केली होती. पुन्हा ती रेती अनेकांनी जमा करणे सुरू केले आहे.
डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे २०० ब्रास अवैध रेतीचा साठा केला होता. त्यावर महसूल प्रशासनाने कारवाईच्या नावावर संपूर्ण रेती रस्त्यावर भुईसपाट केली. या मार्गाने शेतकरी तथा इतर ग्रामस्थ ये-जा करतात. दुचाकीस्वारांना येथून दुचाकी चालविता येत नाही. रेतीमुळे रस्ता निसरडा झाला आहे. सध्या हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. यामुळे शेतकºयांत असंतोष आहे.
डोगरला गावातही अवैध रेती साठा करून ठेवला होता. रस्त्यावर रेती भुईसपाट केल्यानंतर महसूल प्रशासनाने डोंगरला गावातील अवैध रेती साठा सुद्धा भुईसपाट केला. भुईसपाट केलेली रेती पुन्हा येथे जमा करणे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने केलेली कारवाई थातूरमातूर केली. महसूल प्रशासनाने नियमांचा आधार न घेता हास्यास्पद कारवाई कां केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणात महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही मूग गिळून गप्प आहेत. महसूल प्रशासनाला शासनाकडूनही आतापर्यंत कोणतीच विचारणा करण्यात आली नाही, असे समजते. रेती पंचनामा व जप्तीची कारवाई येथे कां करण्यात आली नाही हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. तुमसर तालुक्यात रेती घाट सुरक्षित नसून अवैध रेतीचा उपसा सर्रास सुरू आहे. येथे महसूल प्रशासनाच्या आशिर्वादामुळेच हा प्रकार सुरू आहे. महसूल प्रशासनाच्या जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.