खड्यात रस्ते!
By Admin | Published: July 11, 2016 12:21 AM2016-07-11T00:21:45+5:302016-07-11T00:21:45+5:30
एखाद्या गावाचा किंवा शहराचा विकास तेथील दळणवळण साधनांच्या सुविधांवर अवलंबून असतो.
वर्षभरात उघडली पोल : नागरिकांचा वाढला त्रास
इंद्रपाल कटकवार / अशोक पारधी भंडारा / पवनी
एखाद्या गावाचा किंवा शहराचा विकास तेथील दळणवळण साधनांच्या सुविधांवर अवलंबून असतो. त्यात दर्जेदार विणलेले रस्त्यांचे जाळे त्या गावाची ओळखही सिद्ध करतात. परंतु भंडारा व पवनी शहरातील रस्ते दरवर्षी पावसाळ्यात धाय मोकळून रडतात. एका वर्षापूर्वी दर्जेदार बांधकाम झालेल्या रस्त्याचे पितळ पावसाळ्यात यंदाही उघडे पडले आहे.
भंडारा शहरात तशीही मनोरंजनात्मक साधनांचा वाणवा आहे. फिरायला जाण्याच्या नावावर आबालवृद्धासांठी बोटांवर मोजण्याइतपत उद्यान आहेत. त्यातही या उद्यानात जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर केला जातो, त्या रस्त्यानेही जीव तोंडात घातला आहे. वर्षभरापूर्वी साई मंदिर मार्ग ते मुस्लिम लायब्ररीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. पावसाला सुरूवात झाली तसतसे रस्त्यानेही खरी रंगत कमी केली की काय? रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले.
किमान दोन वर्ष तरी या रस्त्याचे डांबरीकरण निघणार नाही, असा सज्जड आत्मविश्वास बांधकामावर उपस्थित अभियंत्याने व्यक्त केला होता. वर्ष पूर्ण होण्याआधीच आत्मविश्वास तुटला आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे आता नागरिकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कामाची ही पावती आहे काय? असा सवाल नागरिक बोलून दाखवित आहेत. अशीच अवस्था पांडे महालासमोरील रस्त्याची आहे. याशिवाय जैन डेअरी गल्ली ते निर्वाण गल्ली, ग्रामसेवक कॉलनीतील जलशुद्धीकरण संयत्रासमोरील रस्ता, खांबतलाव चौक ते शास्त्री चौक, राजीव गांधी चाकात असलेल्या चव्हाण हॉस्पीटल ते खात रोडकडे जाणारा मार्ग, मुस्लिम लायब्ररी ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक आदी रस्त्यांचे हाल झाले आहेत.
काही रस्ते नगर पालिका हद्दीत तर काही रस्ते राज्य बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. मात्र या रस्त्याच्या डागडुजीकडे वेळवर लक्ष दिले जात नाही. डागडुजी केली जात असली तरी मलिदा लाटण्यावर जास्त व गुणवत्तेवर कमी भर असतो. परिसणामी ज्वंलत स्थिती प्रत्येक वर्षी पावसाळ्यात डोळ्यासमोर उभी राहते.