नव तलावाकडे जाण्याचा मार्ग बंद; नगर परिषदेच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:45 PM2024-08-12T13:45:27+5:302024-08-12T13:49:02+5:30
Bhandara : प्रकरणाची माहिती गावातील नागरिकांनी दिली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : नागझिरा रोडकडून जाणाऱ्या नव तलावाचा मार्ग एका संस्थापकाने चक्क लोखंडी गेट लावून बंद केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणाची माहिती गावातील काही नागरिकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिली आहे. आता ते यावर काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
साकोलीच्या नव तलावात मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. या अतिक्रमणामुळे तलावाचे क्षेत्रफळ दिवसेंदिवस कमी झाले आहे. साकोली येथील जल व जमीन बचाव समिती तसेच पट समिती यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी नव तलावातील अतिक्रमण काढून फेकले व तलावाची जागा मोकळी करून दिली.
मात्र काही दिवसांतच या तलावाच्या मार्गावर एका संस्थापकाने चक्क लोखंडी गेट लावून या तलावाकडे जाण्याचा मार्ग बंद केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संस्थापकाला प्रशासकीय भीती आहे किंवा नाही, असा प्रश्न समोर येत आहे. जागा ही अतिक्रमण असून हा तलावाकडे जाण्याचा मार्ग आहे, तो तत्काळ मोकळा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.