३२ कोटीतून साकारणार ५८ कि.मी.चे रस्ते
By admin | Published: September 30, 2016 12:39 AM2016-09-30T00:39:19+5:302016-09-30T00:39:19+5:30
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१६-१७
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना : सातही तालुक्यांचा योजनेत समावेश
देवानंद नंदेश्वर भंडारा
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात बॅच १ अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ३१.२३ कोटी रुपये खर्चून ५७.८३ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
भंडारा जिल्ह्यातील ९ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यात सातही तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील श्रीनगर ते बोरगाव या ८.७० किमी. रस्त्यासाठी ३५८.५२ लाख, तुमसर तालुक्यातील सिंदपुरी ते गोंदेखारी महालगाव या ७.०९ किमी. रस्त्यासाठी ४८६.४२ लाख, मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव- धर्मापुरी- भिकारखेडा- टांगा- उसर्रा या १०.५२ किमी. रस्त्यासाठी ५११.७१ लाख, पवनी तालुक्यातील कोंढा- सेंद्री (बुज.) राज्य मार्गपर्यत या ७.८३ कि.मी. रस्त्यासाठी ३८९.१७ लाख, लाखांदूर तालुक्यातील परसोडी- भागडी- मांढळ- सरांडी- मासळ या ९.३० किमी. रस्त्यासाठी ५३९.५५ लाख, लाखनी तालुक्यातील कनेरी ते केसलवाडा- रेंगोळा- मांगली- किटाळी या ५ कि.मी.साठी २४९.८७ लाख, मांगली ते मचारणा मुरमाडी (हमेशा) या ३.६ किमी. रस्त्यासाठी १६१.१७ लाख, साकोली तालुक्यातील राज्यमार्ग ते चारगाव परसोडी उमरी या २.१९ किमी. रस्त्यासाठी १५८.२६ लाख आणि पळसगाव- चिचटोला- बोळदे- सालई या ४.१४ किमी. रस्त्यासाठी २६८.९६ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी रस्त्याच्या दर्जोन्नती करण्यासाठी ई-टेंडरिंग करुनच कायार्रंभाचे आदेश द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. सदर रस्त्यांसाठी लागणारी जमीन कुठल्या विभागाच्या ताब्यात आहे, याची खात्री करावी करावी लागेल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निधीतून होणाऱ्या या बांधकामामुळे रस्त्याचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जाणार आहे.
देखभाल दुरुस्तीसाठी २.१७ कोटी
सातही तालुक्यातील एकूण ५७.८३ किलोमीटरच्या लांबीच्या रस्त्याला ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असताना या कामाची ५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी २.१७ कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद रस्तानिहाय तालुकास्तरावर करण्यात आली.
परसोडी-मासळसाठी सर्वाधिक निधी
लाखनी, साकोली तालुक्यातील दोन रस्ते व अन्य चार तालुक्यातील प्रत्येकी एक रस्त्याच्या कामाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. यात सर्वाधिक निधी लाखांदूर तालुक्यातील परसोडी-भागडी-मांढळ- सरांडी-मासळ या ९.३० किलोमिटर रस्त्यासाठी ५.३९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर सर्वात कमी निधी साकोली तालुक्यातील चारगाव - परसोडी - उमरी या २.१९ किलोमीटर रस्त्यासाठी १.५८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.