लाखनी तालुक्यातील रस्ते गेले खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:58 AM2021-05-05T04:58:12+5:302021-05-05T04:58:12+5:30
लाखनी : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात? अशी परिस्थिती आहे. यामुळे ...
लाखनी : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात? अशी परिस्थिती आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे.
शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याची ओरड आहे. दरवर्षी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीकरिता शेत रस्ते नाहीत तर, काही ग्रामपंचायत हद्दीमधील गावांमध्ये जाण्यासाठीसुद्धा रस्ते नाहीत. त्यामुळे याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाच्या वतीने जिल्हा परिषद व आमदार निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतो. मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. जनतेच्या हितासाठी निधी उपलब्ध करून देऊनसुद्धा त्या निधीचा गैरवापर करून थातूरमातूर रस्त्याचे व नालीची कामे केली जातात, हे वास्तव चित्र आहे.
लाखनी तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतअंतर्गत गावात येणारे मुख्य रस्ते हे अतिशय खराब झाले आहेत. त्या रस्त्याच्या सुधारणेसाठी संबंधित गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार देऊनसुद्धा संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
त्यामुळे एखादे वाहन रस्त्यावर अडकले तर ते काढण्यासाठी भाड्याने दुसरे वाहन आणावे लागत असल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळेच असे प्रसंग नागरिकांवर ओढवत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी शहरासोबतच ग्रामीण भागातील गावाकडे लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बॉक्स
तालुक्यातील या रस्त्यांची अवस्था बिकट
लाखनी परिसरातील मानेगाव ते आलेसूर, बोरगाव, पिंपळगाव ते सामेवाडा, बोरगाव ते राजेगाव चान्ना ते धानला, नावेझरी, खुर्शीपार, मलकाझरी, पोहरा, पेंढरी ते रेंगोळा, किटाडी, मांगली, पालांदूर ते गोंदी रस्ता, गोंदी-ढीवरखेडा मार्ग, ढीवरखेडा गावातील अंतर्गत रस्ता, जुना मऱ्हेगाव ते नवीन मऱ्हेगाव रस्ता, वाकल ते तई, वाकल ते हरदोली रस्ता, वाकल ते देवरी रस्ता, खराशी ते घोडेझरी रस्ता, खराशी ते पाथरी रस्ता, निमगाव ते घोडेझरी रस्ता, पाथरी ते मऱ्हेगाव रस्ता या सर्व रस्त्यांची अवस्था बिकट आहे.
एखादे निवेदन आल्यास किंवा प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला जाग येते. यावेळी थातूरमातूर दुरुस्ती करण्याचा देखावा केला जातो. अशीच परिस्थिती परिसरातील पांदण रस्त्यांची आहे.