ट्रॅव्हल्सकडून लूट; नागपूरला मोजावे लागतात 150 रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 05:00 AM2022-01-09T05:00:00+5:302022-01-09T05:00:56+5:30
सकाळी, सायंकाळी वर्दळीच्या वेळेतच भंडारा बस स्थानक, त्रिमूर्ती चौकात वर्दळ असते. शासकीय कार्यालये सुटल्यानंतर नागपुरसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे ट्रॅव्हलचे तिकीट दर वाढले आहेत. सर्वसामान्य माणसांना प्रवास करणे कठीण झाले आहे. यावर सरकारने अंकुश ठेवण्याची गरज आहे. एकीकडे रोजगार उपलब्ध नाही. तर दुसरीकडे मात्र प्रवासासाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने आता करायचे काय असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.
भंडारा : एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे नाव घेईना, तर दुसरीकडे खासगी वाहनधारक, ट्रॅव्हलवाले प्रवाशांची लूट करत आहेत. एसटीच्या तुलनेत खासगी वाहनचालक अधिक तिकीट घेत आहेत. नागपूरसाठी प्रवाशांना १५० रुपये मोजावे लागतात. यामुळे एसटी संपामुळे प्रवाशांची अतोनात लूट होत आहे. त्यामुळे खासगी वाहनांना एक प्रकारचे एसटी बस स्थानकातून प्रवासी वाहतुकीची मुभाच मिळाली आहे. ही संधी साधत खासगी वाहनधारकांनी एसटीपेक्षा जास्त तिकीट दर आकारले आहेत. सकाळी, सायंकाळी वर्दळीच्या वेळेतच भंडारा बस स्थानक, त्रिमूर्ती चौकात वर्दळ असते. शासकीय कार्यालये सुटल्यानंतर नागपुरसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे ट्रॅव्हलचे तिकीट दर वाढले आहेत. सर्वसामान्य माणसांना प्रवास करणे कठीण झाले आहे. यावर सरकारने अंकुश ठेवण्याची गरज आहे. एकीकडे रोजगार उपलब्ध नाही. तर दुसरीकडे मात्र प्रवासासाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने आता करायचे काय असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.
सायंकाळी सर्वाधिक गर्दी
- भंडारा शासकीय कार्यालयांत काम करणारे बरेच जण नागपूरहून ये-जा करतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची गर्दी होते. या वेळेत खासगी वाहनांकडून नागपूरला दीडशे ते २०० रुपये आकारले जात होते. प्रवाशांनी तक्रार केल्यास वाहनधारक अरेरावी करतात. काही प्रसंगी धक्काबुक्की केल्याचेही उदाहरणे घडली आहेत.
आरटीओ तपासणी नाही
- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध पथकांच्या माध्यमातून लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्सची आरटीओ विभागाने नियमित तपासणी करण्याची गरज आहे. जवळपासच्या साकोली, तुमसर, पवनी मार्गावरही अनेक ट्रॅव्हल्स सुरू आहेत. यांच्यावरही कारवाई करून, अधूनमधून तपासणी करावी.
तरीही कारवाई नाही...
- वाहनांकडून दर वाढवले जात आहेत. एसटी सुरू झाल्या तर ही अडचणच राहणार नाही. एकीकडे एसटी कर्मचारी अडुन बसले आहेत तर दुसरीकडे खासगी वाहनचालक लुट करीत आहेत.
पैसे जास्त देण्याशिवाय पर्याय काय?
परिवहन विभागाकडून ट्रॅव्हल्सची नियमित तपासणी केली जात नाही. अद्याप जास्तीचे दर आकारल्याचे आढळूनही का कारवाई होत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. तक्रार करूनही ट्रॅव्हल्सवर कारवाई होत नसल्याने लूट होत आहे.
-संदीप हटवार, परसोडी, प्रवासी.
पूर्वी नागपूरला जाण्यासाठी भरपूर एसटी मिळत होत्या. दरही तसे कमीच होते. आता खासगी वाहने पुरेशी नाहीत. त्यामुळे दरही वाढीव आकारले जात आहेत. मिळेल त्या वाहनाने दाटीवाटीत प्रवास करावा लागत आहे.
-आशिष मेश्राम, भंडारा, प्रवासी.