रोहयो कामात मजूरच नाही
By admin | Published: June 19, 2017 12:30 AM2017-06-19T00:30:43+5:302017-06-19T00:30:43+5:30
मग्रारोहयो अंतर्गत पांदण रस्ता कामावर मजुराऐवजी यंत्राचा वापर करुन मजुरांना काम देणाऱ्या ....
मांढळ येथील प्रकार : बोगस मस्टर दाखवून पैशाची उचल
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मग्रारोहयो अंतर्गत पांदण रस्ता कामावर मजुराऐवजी यंत्राचा वापर करुन मजुरांना काम देणाऱ्या मग्रारोहयो योजनेला हरताळ फासल्याचा प्रकार तालुक्यातील मांढळ (देव्हाडी) ग्रा. पं. मध्ये घडला. परिणामी तेथील सजग ग्राम पंचायत सदस्यांनी वरिष्ठाकडे तक्रार केल्याने सरपंच, सचिवांनी केलेल्या भ्रष्टाचार उजेडात आणला आहे.
मांढळ (देव्हाडी) अंतर्गत अखाडु राघोर्ते ते चंद्रकला सेलोकर, दुधराम ठवकर ते बकाराम अतकारी, नत्थु सेलोकर ते प्रल्हाद चौधरी यांच्या घरापर्यंतचे पांदन रस्ते तयार झाले होते. मुरुम काम ही मग्रारोहयो तुनच करायचे होते. मुरुम खोदाईपाूसन ते मुरुम रस्त्यावर घालण्याचे काम मजुराकडून करुन घ्यायचे नियम असतांना मांढळ येथील सरपंच व सचिवांनी संगणमत करुन मुरुम खोदाई व मुरुम पसरविण्याकरिता जेसीबी व ट्रॅक्टर राफडीचा वापर केला. नियमाप्रमाणे कामे न करता अनियमितता करुन सरंपच, सचिवाने मर्जितल्या मजुरांचे नावे मस्टरला दर्शवून त्या मजुरांचे देयके लाटून शासनाच्या लाखो रुपयांचा गैरव्यवहार येथे होत असल्याची कुणकुण ग्राम पंचायत सदस्यांना लागताच सुरेंद्र वहिले सह ग्रा. पं. सदस्य क्रिष्णा चौधरी, हिराबाई चौधरी, चंद्रप्रभा पंचबुध्दे, राजेश वहिले, नामेश्वर टांगले, महेंद्र चौव्हान यानी मग्रारोहयो सचिव आयुक्तसह जिल्हाधिकारी मुख्याधिकाऱ्यांना तक्रार पाठवून सदर कामाची चौकशी करुन माती मिश्रीत मुरुम व देयकाची रक्कम अदा करु नये सदर रक्कम अदा केल्यास सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहील असा सल्ला देऊन सरपंच सचिवावर कारवाईची मागणी आहे.