रोहयो कामावर १२ हजार मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 12:48 AM2017-04-20T00:48:13+5:302017-04-20T00:48:13+5:30
तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ९२ कामे सुरु आहेत. ११ हजार ८२२ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
लाखनी तालुका : रोहयो कामांची मागणी, ७६ हजार मजुरांची नोंदणी, ९२ कामे सुरु
चंदन मोटघरे लाखनी
तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ९२ कामे सुरु आहेत. ११ हजार ८२२ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना रोहयो कामाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात रोहयो कामांना गती मिळाली असली तरी पंचायत समिती व ग्रामपंचायत पुरेशा मजुरांना हाताला काम देण्यास अपुरे ठरत आहे.
तालुक्यात मामा तलावाची १७ कामे, सेलोटी डोंगरगाव /न्या., देवरी, खराशी, मोरगाव, बोरगाव, किन्ही, निलागोंदी, घोडेझरी, डोंगरगाव/साक्षर, सोनगाव, खुनारी, निमगाव, कन्हाळगाव, शिवनी येथे सुरु आहेत. या कामांवर ४९६२ मजूर काम करीत आहे. नाला सरळीकरणाची ७ कामे सुरु. कोलारी, लाखोरी, पालांदूर, सावरी, गोंडेगाव, झरप येथे सुरु आहेत. या कामावर २९४५ मजूर कामावर आहेत. पांदन रस्त्याची ११ कामे गोंडसावरी, मोगरा, कनेरी, दिघोरी, खेडेपार, गुरढा, जेवनाळा, राजेगाव, केसलवाडा / पवार, खुर्शीपार येथे सुरु आहे. पांदण रस्त्याच्या कामावर ३५४१ मजूर कामावर आहेत. सिंचन विहिरीची १२ भातखाचऱ्यांचे ३ कामे, मुरमाडी / तुपकर येथे सुरु आहेत. तेथे ३३ मजूर कामावर आहेत. तालुक्यात ७१ ग्रामपंचायत व १०४ गाव आहेत. २६ हजार ८९८ कुटुंबांचे जॉब कार्ड तयार करण्यात आले आहेत. तालुक्यात ७६ हजार ४८८ मजुरांची नोंदणी आहे. त्यापैकी १२ हजार मजुरांना काम मिळाले आहे. तालुक्यात रोजगार हमी कामाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. अनेक मजूर कामांच्या प्रतिक्षेत आहेत. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरून कामाचे नियोजन होवून प्रशासकीय मंजूरी मिळण्यास विलंब होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उदासीन धोरणामुळे तालुक्यात रोहयो कामांना गती मिळालेली नाही. तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. मजुरांना काम मिळत नाही. यामुळे मग्रारोहयो कामाकडे जनतेचे लक्ष लागले आहे.