रोहतकच्या पहेलवानाने पटकाविली मानाची गदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:30 PM2018-01-30T22:30:50+5:302018-01-30T22:31:24+5:30
श्रीसंत गजानन महाराज वारकरी समुहाच्यावतीने स्थानिक श्री गणेश शाळेच्या प्रांगणात झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरीयाणा राज्यातील रोहतकचा पहेलवान अमितकुमार याने प्रथम क्रमांक पटकावित मानाची गदा पटकाविली.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : श्रीसंत गजानन महाराज वारकरी समुहाच्यावतीने स्थानिक श्री गणेश शाळेच्या प्रांगणात झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरीयाणा राज्यातील रोहतकचा पहेलवान अमितकुमार याने प्रथम क्रमांक पटकावित मानाची गदा पटकाविली.
बंगलोर येथील राकेशकुमार व रोहतक येथील अमितकुमार यांच्यात अंतिम सामना झाला. पहिल्या फेरीमध्ये राकेशकुमारने ७ व २ ने आघाडी घेतली होती. मात्र दुसरा राउंड सुरू होताच अमितकुमारने आक्रमक कुस्ती खेळून राकेशकुमारचा पराभव करून कुस्ती १६.१० गुणाने जिंकून मानाची गदा पटकाविला. तिसरा क्रमांक दिल्ली येथील हनुमान आखाड्याचा पहेलवान रवी यादव तर चौथा क्रमांक २०१७ चा विदर्भ केसरी विजेता शोएब शेख रा.अमरावती याने क्रमांक पटकावला.
महिला गटात प्रथम क्रमांक तेजस्वीनी दहिकर रा.अमरावती, द्वितीय क्रमांक गीता चौधरी रा.भंडारा, तृतीय क्रमांक शितल सव्वालाखे रा.चिचाळा रामटेक यांनी पटकाविला. या स्पर्धेत महाराष्ट्रासह, पंजाब, हरियाणा, रोहतक, बेंगलोर, कोल्हापूर, दिल्ली, वाशीम, मंगरूळपीर येथून १५५ मल्ल तर ६५ महिला पहलवानांनी सहभाग घेतला. विभागीय गटात नवनाथ भूषणार रा. वर्धा प्रथम, निलेश दमाहे रा. चिचाळा द्वितीय, अक्षय लोनगाडगे रा. चंद्रपूर तृतीय क्रमांक पटकाविला.
विदर्भस्तरीय व ओपन गटातील कुस्त्या रंगल्या. तरूणांमध्ये कुस्त्यांची आवड निर्माण व्हावी, यासाठी पेशाने पोलीस असलेले रमेश चोपकर यांच्या पुढाकारातून श्रीसंत गजानन महाराज वारकरी समुहाच्यावतीने स्थानिक श्री गणेश शाळेच्या प्रांगणात दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील कुस्ती शौकीनांची गर्दी होती.