रोवणीला मजूर सापडेना
By admin | Published: July 14, 2016 12:39 AM2016-07-14T00:39:49+5:302016-07-14T00:39:49+5:30
पावसाच्या दमदार आगमनानंतर पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी रोवणी प्रारंभ केला आहे.
मजुरी वाढली : रोवणीच्या कामाला वेग, खतांच्या किंमती जुन्याच दराने
मुखरू बागडे पालांदूर
पावसाच्या दमदार आगमनानंतर पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी रोवणी प्रारंभ केला आहे. सध्या रोवणीचा हंगाम असल्याने मजुरी वाढली आहे. यामुळे पालांदूर परिसरात मजूर मिळत नसल्याने बाहेरगावावरून महिला व पुरूष मजुर आणून रोवणी आटोपली जात आहे.
जून महिन्यात पावसाने दगा दिला. पेरणी प्रभावित झाली. जुलै लागताच मान्सून मेहरबान झाला. पहिल्या आठवड्यातच १५२ मि.मी. पावसाची हजेरी लावित शेतकऱ्यांना आनंद देत रोवणीला आरंभ झाला. पालांदूर मंडळात २५ टक्के तर मंडळ कृषी क्षेत्रात २० टक्के रोवणी आटोपली असून पाऊस मेहरबान राहिल्यास १५ दिवसात रोवणी पूर्ण होईल.
पालांदूर व परिसरात स्वतंत्र सिंचन व्यवस्थेतून रोवणीला आरंभ झाला असून त्यांच्या मागोमाग कोरडवाहू शेतकरीही १२-१५ दिवसाचे पऱ्हे शेतीत रोवित असल्याने मागे पुढे रोवणी सुरू झाली आहे. यामुळे मजुरांची तीव्र टंचाई सुरू आहे. वाकल, तई, हरदोली, ढिवरखेडा, मऱ्हेगाव, किटाडी, पिलांद्री येथून मजुरांची आवक सुरू आहे. महिलांना दिवसाकाठी १०० तर पुरूषांना २०० रूपये मजुरी दिली जात आहे. हुंडा पद्धतीत २२००-२४०० रूपये प्रती एकर रोवणीचा दर सुरू आहे.
जुन महिन्यात फक्त ९४.३ मि.मी. पावसाने हजेरी लावली होती. यंदाही दृष्काळ पडेल का, ही भिती शासन प्रशासनासह शेतकऱ्याला पडली होती. मात्र निसर्ग खरचं श्रेष्ठ असल्याचे ठासून सांगत धरतीमातेला तृप्त केले. जलसाठ्यात २० टक्के वाढ झाली असून नदी नाले प्रवाहित झाले आहेत.
विहिरी, बोअरवेल्सच्या भुजलसाठ्यात सुधारणा झाली आहे. ट्रॅक्टरच्या मुबलकतेने शेती कसायला मोठी मदत झाली असून शारीरिक श्रमाची बचत झाली आहे. खतांच्या किंमती केंद्र शासनाने कमी केल्या खऱ्या पण कृषीकेंद्रात जुन्याच दराने विक्री सुरू आहे. शासन प्रशासन यांनी समन्वय साधन कृषी केंद्रधारकांना विश्वासात घेत त्यांच्या जुन्या खरेदीचा विचार करून मार्ग दिला तर खेतकऱ्यांना सुद्धा कमी दराचा फायदा मिळू शकतो. अन्यथा घाऊक व्यापाऱ्यांची चांदी होवून लहान व्यापारी पिसला जाऊ शकतो याचा थेट नुकसान शेतकऱ्यांना बसू शकतो.