समाज विकासासाठी पत्रकारितेची भुमिका महत्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:17+5:302021-01-08T05:54:17+5:30
भंडारा : नवीन पिढीने नवीन विचारसरणी आत्मसात करावी, व्यसनाधिनता, शारीरिक श्रम व मानसिक श्रम घेण्याची तयारी ठेवावी. तरच समाजाचा ...
भंडारा : नवीन पिढीने नवीन विचारसरणी आत्मसात करावी, व्यसनाधिनता, शारीरिक श्रम व मानसिक श्रम घेण्याची तयारी ठेवावी. तरच समाजाचा विकास साधला जाईल. सामाजिक विकासासाठी लिखाण करणे ही पत्रकारांची जबाबदारी असून त्यांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी मराठी पत्रकार संघ भवनात दि. ६ जानेवारी २०२१ रोजी आयोजित मराठी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमादरम्यान केले.
मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. स्थानिक मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विनय मून, उद्घाटक जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, उपाध्यक्ष राकेश चेटूले,सचिव मिलिंद हळवे, कोषाध्यक्ष डी.एफ.कोचे, लोकमतचे ज्ञानेश्वर मुंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणादरम्यान विनय मून यांनी प्रशासनिक सेवेत काम करतांना ग्रामीण भागातील मूलभूत समस्या जाणून घेण्यासाठी पत्रकारितेची भूमिका किती महत्वाची असते हे विशद केले. उद्घाटनीय भाषणादरम्यान रवी गीते यांनी पत्रकारांनी भूमिका घेऊन अभ्यासपूर्ण लिखाण करावे, आणि बातमी मागची भूमिका आरशाप्रमाणे स्पष्ट मांडावी असे पोटतिडकीने सांगितले. कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना चेतन भैरम यांनी वृत्तपत्रांचे वृत्तांकन हे समस्यांना वाचा फोडणारे असावे जेणेकरून आपल्या लेखणीतून समाजाला दिशा मिळेल अशा मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले. तसेच ज्ञानेश्वर मुंदे यांनी सत्य, पोषक आणि समाधानकारक वृत्तलेखन करणे आजच्या युगात किती गरजेचे आहे यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी हिवराज उके यांनी आगामी काळात वृत्तांकन करतांना पत्रकारांसमोर येणाऱ्या समस्या मांडल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एफ.कोचे यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद हळवे यांनी केले. तर कार्यक्रमाला पत्रकार बंधूंमध्ये शशीकुमार वर्मा, इंद्रपाल कटकवार, देवानंद नंदेश्वर, मोहन धवड, सुरेश कोटगले, तथागत मेश्राम, अतुल खोब्रागडे, हिवराज उके, दीपक रोहणकर, आबीद सिद्दीकी, प्रवीण तांडेकर, हरीश मोटघरे, सुरेश फुलसूंगे तसेच वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष किशोर मोरे, विजय निर्वाण, नरेंद्र गौरी, शारदा पडोळे, सीताराम जोशी, नवनीत जोशी, विजय क्षीरसागर,विलास सुदामे, ललितसिंह बाच्छिल, यशवंत थोटे, कालिदास खोब्रागडे, मनोहर लोथे, नेपालचंद्र खंडाईत, सुनील फुलसुंगे यांसह जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पृथ्वीराज बन्सोड, चेतन शेंडे, संजय भोयर यांनी सहकार्य केले.