सिलिंडरच्या स्फोटात घराचे छप्पर उडाले
By admin | Published: January 29, 2017 12:46 AM2017-01-29T00:46:10+5:302017-01-29T00:46:10+5:30
घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराचे छत उडाल्याची घटना लाखनी तालुक्यातील मेंगापूर येथे
मेंगापूर येथील घटना : समयसूचकतेने जीवितहानी टळली
पालांदूर : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराचे छत उडाल्याची घटना लाखनी तालुक्यातील मेंगापूर येथे घडली. गॅसची गळती झाल्याने व हवेच्या झोताने लाईटर न लावताही विजेच्या बल्ब सुरू करताच स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यात घराचे व जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही. ही घटना शुक्रवारच्या रात्री मेंगापूर येथील जयदेव बेलखोडे यांच्या घरी घडली.
नित्याप्रमाणे जयदेव यांच्या पत्नी माजी सरपंच गुणा बेलखोडे या सायंकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरू करण्याकरीता सिलिंडर्सच्या रेग्युलेटरची बटण फिरविली असता त्यांना गॅस लिक होताना दिसले. त्यामुळे घाबरून त्या घराबाहेर पडल्या. बाहेर अंगणात येताच गॅसचा स्फोट झाला. क्षणार्धात अख्खे घर आगीने कवेत घेतले. आरडाओरड सुरू झाली. पाण्याचा मारा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतू हवेचा झोत प्रवाह अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. स्वयंपाकघरापासून अंगणापर्यंतची सर्व घराची दारे खुली असल्याने व हवेची दिशाही त्याच दिशेने असल्याने घरातील जीवनावश्यक साहित्यानेही पेट घेतला. बाहेर स्वयंपाकघर व त्यांच्यासमोरील खोलीचे छत, कवेलू, फाटे जळून खाक झाले. आग विझविण्याच्या प्रयत्नात सर्वच साहित्याचे नुकसान झाले. घरातील रोख पैसेही जळाले. या आगीत बेलखोडे यांचे सुमारे चार-पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तलाठी पंचनाम्यात १,७५,८०० रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे पंचासमक्ष नमूद करण्यात आले.
आठवडाभरापुर्वी गॅस सिलिंडर आणण्यात आला होता तो काल दुपारी सुरू करण्यात आला. २० वर्षापासून गॅस वापरत असून गॅस कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप बेलखोडे कुटुंबीयांनी केला आहे.
याप्रकरणी प्रशासनाने योग्य ती चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन शक्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
बेलखोडे कुटूंबीय दारिद्रय रेषेखालील यादीत असून त्यांच्यावर आलेल्या संकटाने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. हा गॅस हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पाेरेशन या कंपनीचा असून घटनेनंतर या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. निरिक्षणाअंती झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरीता सकारात्मक प्रयत्न करण्याचा शब्द या अधिकाऱ्यांनी बेलखोडे कुटुंबीयांना दिला आहे. (वार्ताहर)