रॉयल्टी तुमसरची, गिट्टी मात्र साकोली तालुक्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:00 AM2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:48+5:30
तालुक्यात गौण खनिजांचे अवैधपणे उत्खनन होत असल्याचे प्रकरण घडत आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकाने वडद पहाडीजवळील सावरबंध येथे गिट्टीचे चार ट्रक अडवून त्याची तपासणी केली. यात रॉयल्टीची तपासणी केली असता ट्रक चालकांजवळ रॉयल्टी ही तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील असल्याचे आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यात रेती तस्करीच्या घटना घडत असताना महसूल विभागही खळबळून जागा झाला आहे. महसूल विभागाने शुक्रवारी कारवाई करत गिट्टीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रक पकडले. विशेष म्हणजे रॉयल्टी ही तुमसर तालुक्याची असून गिट्टीचा भरणा मात्र साकोली तालुक्यातील आहे.
तालुक्यात गौण खनिजांचे अवैधपणे उत्खनन होत असल्याचे प्रकरण घडत आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकाने वडद पहाडीजवळील सावरबंध येथे गिट्टीचे चार ट्रक अडवून त्याची तपासणी केली. यात रॉयल्टीची तपासणी केली असता ट्रक चालकांजवळ रॉयल्टी ही तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील असल्याचे आढळले. तपासणीच्यावेळी सदर ट्रकमध्ये भरलेली गिट्टी ही साकोली तालुक्यातील वडद पहाडीतील असल्याचे समोर आले.
नियमाप्रमाणे ज्या ठिकाणाहून गिट्टी भरली जाते त्याच ठिकाणची रॉयल्टी घेणे आवश्यक असते. मात्र या चारही ट्रकमधील रॉयल्टी तुमसर तालुक्यातील असल्यामुळे सदर ट्रक तहसील कार्यालय साकोली येथे जमा करण्यात आले. एक ट्रक नादुरूस्त असल्याने घटनास्थळीच आहे.
चारही ट्रक हे शिवालय कंस्ट्रक्शन कंपनी लाखनी यांच्या मालकीचे असून यात ट्रक क्रमांक एमएच ३६ एए ३३५८, एमएच ३५ एजे १६८५, एमएच ४० बीएल ७४८५ व एमएच ४० एम ४६०५ असा आहे. ही कारवाई तहसीलदार तेढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक लोकेश कोटेवार, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी सिडाम, हटवार, बिसेन यांनी केली.
कारवाईकडे सर्वांचे लक्ष
नियमाप्रमाणे ज्या परवानगीधारक ठेकेदाराला पहाडीतील गिट्टीचे खनन करून विक्री करण्याचे अधिकार आहेत. त्यांनाच ट्रक किंवा ट्रॅक्टरमध्ये गिट्टी भरल्यानंतर रॉयल्टी देण्यात येते. विनारायल्टीने गिट्टी दिल्यास कंत्राट रद्द करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहे. परिणामी या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.