मुरूम विना रॉयल्टीचा; जेसीबी मशीनच्या सहाय्याने गौण खनिजाची विल्हेवाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:48 IST2025-01-30T12:47:47+5:302025-01-30T12:48:58+5:30
लाखो रुपयांचा महसूल बुडाला : चुल्हाड ते पिंपरी चुन्नी मार्गावरील प्रकार

Royalty-free Murum; Disposal of minor minerals with the help of JCB machines
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड ते पिंपरी चुन्नी गावाला जोडणाऱ्या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. ३ किमी अंतरासाठी ३ कोटी रुपयांचा निधी आहे. आधी मार्गाचे खडीकरण करण्यात आले आहे. खडीकरणाच्या कामात थेट चुल्हाड गावातून मुरूम उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु या मुरुमाची रॉयल्टी काढण्यात आली नाही. वाहतुकीच्या खर्चात बचत करण्यासाठी चोरीचा मुरूम उपयोगात आणले आहे.
गावाच्या शेजारी होणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय कामात याच मुरुमाचा उपयोग केला जात आहे. रॉयल्टी अन्य गावातून कंत्राटदार काढत असले तरी वाहतुकीचा खर्च येत असल्याने चुल्हाड गावातून मुरूम उपलब्ध करण्यात येत आहे. चुल्हाड ते पिंपरी चुन्नी गावाला जोडणाऱ्या ३ किमी अंतराच्या मार्गाला डांबरीकरण कामाला मंजुरी देण्यात आली आहे. तुमसर तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती योग्य नाही. रस्त्याच्या कडा धोकादायक ठरल्या आहेत. तिथेही मुरुमाचा अभाव आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सपेशल दुर्लक्ष करीत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
गावातील युवकांना टेंडर
कोट्यवधीच्या कामात मुरुमाची गरज असल्याने कंत्राटदाराने गावातील युवकांना सोबत घेतले. रॉयल्टी वाचविण्यासाठी गावातून युवकांच्या माध्यमातून मुरूम खरेदी केले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने मुरुमाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. गाव आणि गावाच्या शेजारी असणारे ट्रॅक्टर मुरूमाच्या वाहतुकीत उपयोगात आणले गेले आहे. यातही मोठी कंत्राटी भूमिका घेण्यात आली आहे.
महसुलाला तिलांजली
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. मोठे कंत्राटदार यात गुंतले आहेत. शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा झाला असता, मात्र तिलांजली देण्यात आली आहे. कोट्यवधींच्या कामातही चोरीचा मुरुमाचा वापर केला गेला. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पोखरून काढत कंत्राटदार मात्र गब्बर झाले आहेत. दरम्यान, पुन्हा याच मार्गाचे कडेला मुरूम घातले जाणार असल्याची माहिती आहे.
३ किमी अंतरासाठी लाखो रुपयांचा मुरुमाचे खणन
रॉयल्टी नसताना मुरुमाचे खणन होत आहे. म्हणजेच गौण खनिज उत्खनन होत असताना महसूल व खनीकर्म विभाग मूग गिळून असल्याने संशय बळावला आहे.
डांबरीकरणाचे काम पण रॉयल्टी काढलीच नाही
३ कोटींचा निधी मार्ग खडीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामासाठी मंजूर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मार्गाचे खडीकरण करण्यात आले आहे. मुरूम मात्र चुल्हाड गावातून काढण्यात आले आहे. गावातून मुरूम उत्खनन करताना रॉयल्टी काढण्यात आली नाही. मार्गाच्या खडीकरणात मुरूम गावातून उपलब्ध करण्यात आले आहे. शेतकऱ्याचे शेतशिवार खोदले गेले आहेत. तालुक्यात ठिकठिकाणी अन्य कामे सुरु असताना तिथेही रॉयल्टी नसलेली वाळु आणि मुरुमाचा उपयोग केला जात आहे. माहिती देऊनही तालुका प्रशासन कारवाईसाठी पुढे येत नसल्याचे दिसते.
"गावाशेजारी जागेत मुरूम चोरीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. गत सहा महिन्यांपासून कुठलेही रॉयल्टी संदर्भात ग्रामपंचायतमध्ये जाहीरनामा प्रसिद्धीसाठी आलेला नाही. महसूल विभागाने निश्चितच चोरीच्या मुरूम संदर्भात मोठी कारवाई करण्याची गरज आहे."
- चंदा ठाकरे, सरपंच, चुल्हाड