पालांदूरच्या बायपास रस्त्याकरिता अडीच कोटी रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:31 AM2021-03-14T04:31:22+5:302021-03-14T04:31:22+5:30
पालांदूर : बहुप्रतीक्षित असलेल्या पालांदूर येथील बायपास रस्त्याकरिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रयत्नांनी राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये २.५ कोटी ...
पालांदूर : बहुप्रतीक्षित असलेल्या पालांदूर येथील बायपास रस्त्याकरिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रयत्नांनी राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये २.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे बहुउपयोगी असलेला बायपास पूर्ण होणार आहे. गत तीन दशकांपासून पालांदूरला बहुपयोगी असलेला बायपास रस्ता अडगळीत पडला होता.
या रस्त्याला न्याय मिळावा, याकरिता पालांदूर येथील स्थानिक राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या राजकीय नेत्यांकडे साकडे घातले होते. कधी भूसंपादनाचा तर कधी निधीचा प्रश्न पुढे यायचा. यामुळे बायपास रखडलेला होता.
प्रकरण निकाली काढण्याकरिता उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी यांनी थेट पालांदूर येथे भेटून समस्या जाणून घेतली. बायपासकरिता निधी अत्यंत महत्त्वाचा होता. भूसंपादन हाही तेवढाच महत्त्वाचा विषय होता. भूसंपादनाकरिता निधी महत्त्वाचा होता. पैशाची कमतरता असल्याने आर्थिक बजेटमध्ये अपेक्षित निधीची पूर्तता होत नव्हती. याची गाऱ्हाणी आमदार तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे शिष्टमंडळाच्या माध्यमातून मांडल्या गेली. नाना पटोले यांनी समस्या ऐकून पूर्ण करण्याचा शब्द दिला. त्या शब्दाला जागत महाराष्ट्राच्या आर्थिक बजेटमध्ये पालांदूरच्या बायपासकरिता २.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. हा बायपास संजयनगर ते संताजी सभागृहलगतपर्यंत सुमारे पाचशे मीटर एवढा आहे. यात २१ शेतकऱ्यांसह सेवा सहकारी संस्था प्रभावित आहे. ५.५० एकर शेती बायपासमध्ये जात आहे.
संजयनगरपासून बायपासच्या कामाला प्रारंभ केल्यास लवकर काम आटोपून गावकऱ्यांना रहदारीसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल.
पालांदूर येथील बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे. गावात रस्त्याच्या दुतर्फा वसलेली बाजारपेठ अरुंद रस्त्याने प्रभावित आहे. गावातील अंतर्गत रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. व्यापाराची मोठी वाहने रस्त्यावरच उभी राहून रिकामी केली जातात. ग्राहकही स्वतःची वाहने जागेअभावी रस्त्यावरच उभी करतात. यामुळे गावातील वर्दळ संकटात आली असून बायपास हा एकमेव उपाय आहे. बायपासमुळे पालांदूरच्या चौफेर विकासाकरिता मोठी संधी उपलब्ध होईल. प्रशासनाने तत्काळ बजेटमधील निधीचा सदुपयोग करून पालांदूरच्या बायपासला न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे.