भाजीपाल्यात वांग्यांना ४० रुपये किलोचा दर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:18+5:302021-09-23T04:40:18+5:30
पालांदूर : दररोजच्या महत्त्वाच्या भाज्यात वांग्याला अधिक महत्त्व आहे. हटकून बाजारात प्रत्येक घरात वांगे खरेदी केले जातात. वांग्याचे उत्पन्न ...
पालांदूर : दररोजच्या महत्त्वाच्या भाज्यात वांग्याला अधिक महत्त्व आहे. हटकून बाजारात प्रत्येक घरात वांगे खरेदी केले जातात. वांग्याचे उत्पन्न कमी झाले असून मागणी वाढल्याने वांग्याचे दर ४० रुपये किलो प्रतिदराने विकत आहेत. राजकीय भाषेत वांग्याला अच्छे दिन आल्याची चर्चा भाजी बाजारात होत आहे.
श्राद्ध घरोघरी सुरू झालेले आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्याने एकमेकांच्या घरी ये-जा सुरू झालेली आहे. लहान-मोठे कार्यक्रमही पार पडत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला निश्चितच मागणी वाढली आहे. मागणी पुरवठा याचा विचार करता पुरवठा कमी झाला असून, मागणी अधिक वाढल्याने गत पंधरा दिवसांच्या पूर्वीचे भाज्यांचे दर आता दुपटीने वाढले आहेत. निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी सापडलेला आहे. गत दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाचे दिवस असल्याने वांगी पिकाला किडीचा त्रास अधिकच जाणवत आहे. किडीने चांगले वांग्याचा बाजारात पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे वांग्याला अच्छे दिन आलेले आहेत. शेतकऱ्याच्या वांगी कमी जरी निघत असला तरी भाव अर्थात दर चांगला असल्याने शेतकरीसुद्धा समाधानी दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात भाजीपाल्याची शेती सुधारलेली आहे. ठिबक मल्चिंगचा आधार घेत भाजीपाल्याची शेती केली जात आहे. अख्ख्या पावसातही जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पन्न सुमार आहे. गत पंधरा दिवसांपूर्वी भाजीपाल्याचे भाव जमिनीवर आले होते. मात्र आता भाजीपाल्याला अच्छे दिन आले असून सर्वात जास्त भाव वांग्याला मिळत आहे.
प्रतिकिलो ४० रुपये दराने अगदी काही वेळातच व्यापारी वांग्याला मागणी मिळत आहे. बीटीबी सब्जी मंडी भंडारा येथे चवळी शेंग ३५रुपये किलो, वांगे ४० रुपये किलो, कारले ३० रुपये किलो, फुलकोबी २० रुपये किलो, टमाटर २२० रुपये कॅरेट, मिरची २० रुपये किलो, मेथी भाजी शंभर रुपये किलो, भेंडी २० रुपये किलो, दोडका/ तुरई २० रुपये किलो दर सुरू आहे.
कोट
सर्वाधिक भाव वांग्याला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे वांगी पिकाला फूल आणि फळ कमी झालेले आहे. वांग्याच्या पिकाला किडीचासुद्धा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याने कीडग्रस्त वांग्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे निरोगी वांग्याचे उत्पन्न कमी झालेले आहे. त्यामुळे भाव चाळीस रुपयांच्या घरात आहे.
टिकाराम भुसारी, वांगा उत्पादक शेतकरी, पालांदूर
कोट
भंडारा जिल्हा भाजीपाल्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे. मात्र मागणीच्या तुलनेत वांग्याची आवक कमी झाल्याने बाजारपेठेत वांग्याला सर्वाधिक भाव आहे. वांग्याच्या खालोखाल इतरही भाज्यांना बरा भाव आहे. शेतकऱ्यांनी बागेची नीट काळजी वेळेत घेऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करावा. वांग्याला ४० रुपये किलोचा दर मिळत आहे.
बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी भंडारा.
कोट
वांगा पिकावरील कीड नियंत्रणाकरिता रासायनिक कीटकनाशकाव्यतिरिक्त आणखी इतर उपाय शेतकऱ्यांना सुचविलेले आहेत. विषमुक्त अन्न उपक्रमांतर्गत कीडनाशकात काही पर्याय सुचविलेले आहेत. नैसर्गिकता काही प्रमाणात कीड नियंत्रण शक्य आहे. शेतकऱ्यांनी वांग्याच्या बागेत प्रयोग करून अभ्यास घ्यावा.
किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी, लाखनी