पावसाच्या तडाख्याने धान पिकाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2016 01:16 AM2016-10-09T01:16:14+5:302016-10-09T01:16:14+5:30
जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
हजारो हेक्टरातील पीक बाधित : शेतकऱ्यावर ओढावले अस्मानी संकट
भंडारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. उत्पन्नात कमालिची घट होणार असून शेतकरी संकटात सापडला आहे. पावसापासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरुझाला आहे. धानपिक मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाच्या कोपामुळे २० टक्के क्षेत्र पडीत असून जिल्हा प्रशासनाने घोषीत केलेल्या खरीपाची नजरअंदाज पैसेवारी ७२ काढली. त्यामुळे शेतकरी होरपळला आहे. यावर्षी सुरुवातीपासून पावसाने दगा दिला. सिंचनाच्या सहाय्याने कसेबसे पिक लागवड केले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. या हजेरीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी आशा होती. मात्र आॅगस्ट महिन्यात उन्हाळ्यासारखा तापल्याने पिके करपली. त्यानंतर परतीच्या पावसाने सुरुवात केली. मात्र हा पाऊस हलक्या प्रतीच्या धानासाठी कर्दनकाळ ठरत आहे. शुक्रवार व शनिवार रोजी परतीच्या पावसाने कहर केला. पावसामुळे धानपिक मातीमोल झाले आहेत. अलिकडेच जिल्ह्यात हलक्या प्रतिच्या धानाच्या कापणीला सुरुवात झाली होती. या पावसामुळे धानाच्या कडपा पाण्याखाली सापडल्या आहेत. पाण्यात भिजलेल्या ओल्याचिंब कडपा काढून ठेवण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून मदत करण्याची मागणी आहे.
परतीच्या पावसाने हलक्या प्रतीच्या धानाचे नुकसान
पवनी : तालुक्यात सिंचनाची पुरेशी सोय नसलेले तसेच शेतात वर्षाला तीन पीक घेणारे शेतकरी हलक्या प्रतीच्या धानाचे उत्पन्न घेत आहेत. धान कापायला आले अशावेळी परतीचा पाऊस सुरू झाल्याने कापलेल्या धानाचे नुकसान होण्याची शक्यता वाढलेली आहे.
तालुक्यातील अधिकांश शेती निसर्गाचे पाण्यावर केली जात आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी लघु कालव्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे शेतापर्यंत पोहचलेले नाही. अशावेळी १०० ते १२० दिवसात फसल घेता येईल, अशा हलक्या प्रतीच्या धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. धान कापायला आले अशावेळी परतीच्या पावसाने जोर धरलेला असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतात उभ्या असलेल्या धानपिकाचे फारशे नुकसान होत नाही. परंतु कापलेल्या धानाच्या कडप्या पाण्यात बुडून राहिल्याने धानाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर असे धान घेवून गेल्यास त्यांना कमी दर दिल्या जातो. त्यामुळे कष्टाने पिकवलेले धान कमी दराने विकून मोठे नुकसान सोसावे लागते. जमीन पिकासाठी तयार करणे पिकाची लागवड करून जोपासने, रासायनिक खते-किटकनाशकांचा खर्च व मजुरांवर होणार, खर्च याचा विचार करून धानाला भाव मिळावा यासाठी शेतकरी मागणी करू लागले आहेत.
पावसाने आणले शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रृ
पालोरा (चौ.) : यावर्षी वेळोवेळी वरून राजाच्या कृपेने पाऊस येत असल्यामुळे सर्वत्र धान पिक चांगल्या प्रतीचे होते. परिसरात हलके धान पिकाची कापणी सुद्धा सुरू झाली आहे. काल पहाटेपासून दमदार पाऊस आल्यामुळे हलक्या धानाची कापणी झालेल्या धान पिकात पाणी गेल्यामुळे हलके धान मातीमोल झाले आहेत तर वादळामुळे उच्च प्रतिचे धान जमिनीवर कोसळले आहेत. त्यामुळे धान पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पालोरा परिसरात बाम्हणी, मोखारा, खैरी, लोणारा या भागात बऱ्याच प्रभागात हलके धानाचे पिक कापणीवर आले आहेत. पावसाचा अंदाज घेत शेतकरी वर्ग धान कापणे व चुरणा करण्याचा लागला आहे. मागील पंधरवाड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी आनंदात कामाला लागले होते. सर्वत्र धानाची कापनी सुरू होती. काल सायंकाळपासून आकाशाने आपला रंग दाखविताच शेतकऱ्याचे धाबे दणाणले होते. ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले. एक तास पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला गेला.
परतीच्या पावसाने हलक्या धानाचे कंबरडे मोडले
लाखांदूर : पावसाळ्यातील पावसाची तहान अखेर परतीच्या पावसाने भागविली, मात्र परतीचा पाऊस सध्या धान कापणीच्या स्थितीत शेतकऱ्यााठी कर्दनकाळ ठरला असून तालुक्यातील हजारो हेक्टर धानपिकाची नासाडी करून गेल्या ने हातचे पीक गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. चालू वर्षी पावसाळ्यात भरपूर पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज ऐन वेळी सरासरी पेक्षा पाऊस कमी पडल्याने कमी पाण्यात कसरत करून शेतकऱ्यानी रोवणी आटोपली. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यानी शेती पडिक सुद्धा ठेवली. मागील दहा दिवसापासून जोरदार हजेरी लावल्यामुळे धानपिक पाण्यात पडले. धानाला कोंब निघू लागले. चौरास भागात धान पीक कापनीला आले असताना पावसामुळे धानपिकाचे कंबरडे मोडले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)