कोरोना नियंत्रणाकरिता नियम पाळून कर्तव्य बजावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:27+5:302021-02-24T04:36:27+5:30
पालांदूर : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याची चिन्हे आहेत. प्रत्येकाने स्वतः सजग राहत इतरांनाही सजग करीत ...
पालांदूर : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याची चिन्हे आहेत. प्रत्येकाने स्वतः सजग राहत इतरांनाही सजग करीत कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्याकरिता नियमांचे तंतोतंत पालन करा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी केले. पोलीस पाटील यांच्या सभेत पालांदुर पोलीस स्टेशन येथे ते पोलीस पाटलांना मार्गदर्शन करीत होते.
ते म्हणाले, पोलीस पाटील हा समाज व पोलीस विभागातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. समाजातील शेवटच्या टोकापर्यंत सहकार्याच्या भावनेने पोहोचत कोरोना संसर्ग टाळण्याकरिता आपण यापूर्वी लाखमोलाचे कार्य केलेले आहे. आपल्या यथार्थ सेवेने कोरोनाची लाट कमी करण्याकरिता खूप मोठी मदत कामी आली. तीच दृष्टी तीच तळमळ आजही आपण स्वीकारत कोरोनाची दुसरी लाट थांबविण्याकरिता सहकार्य करावे.
शासनाने पुरविलेल्या निर्देशानुसार प्रत्येक सामाजिक व्यक्तीने सामाजिकतेचे भान ठेवून राष्ट्रीय धर्म निभवावा. विनामास्क फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, शक्यतो अजिबात गर्दी करू नये, सॅनिटायजरचा वापर नियमित करावा.
गरज असेल तरच घराबाहेर पडावे. लग्नसमारंभात केवळ ५० व्यक्तींची हजेरी असावी. अंत्यविधीला २० लोकांपेक्षा अधिक असू नये. अशा नियमांत राहून कुटुंबाप्रति जागरूकता बाळगत राष्ट्रीय धर्म जागविण्याकरिता प्रत्येक पोलीस पाटलाने स्वतःच्या गावात कार्यतत्पर असावे. काही समस्या उद्भवल्यास थेट पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवरून संपर्क करून गावात शांतता सुव्यवस्था राखण्याकरिता सहकार्य करावे. सूत्रसंचालन पोलीस पाटील सुनील लुटे, आभार पोलीस शिपाई नावेद पठाण यांनी केले. प्रस्तावना पोलीस पाटील गुनीराम बोरकर यांनी केले. कार्यक्रमाकरिता पो. हवा. कचरू शेंडे, हेमराज मेश्राम, श्यामराव चाचेरे, साहाय्यक फौजदार प्रकाश तलमले आदींनी सहकार्य केले.