पळा, पळा वाघ आला, महिला मजुरांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 08:59 PM2022-01-20T20:59:52+5:302022-01-20T21:00:28+5:30
Bhandara News महिला मजूर शेतात तुरीच्या शेंगा तोडत होत्या. अचानक एका महिलेला वाघ दिसला. आरडा ओरड झाली. पळा वाघ आला म्हणत महिलांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची वार्ता पोहोचताच अनेकांनी शेतशिवारात धाव घेतली.
हरिश्चंद्र कोरे
भंडारा : महिला मजूर शेतात तुरीच्या शेंगा तोडत होत्या. आपल्या कामात गर्क होत्या. अचानक एका महिलेला वाघ दिसला. आरडा ओरड झाली. पळा, पळा वाघ आला म्हणत महिलांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची वार्ता गावात पोहोचताच अनेकांनी शेतशिवारात धाव घेतली. लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. शेतशिवारात गुरुवारी सकाळी वाघ दिसल्याने परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.
गत आठवडाभरापासून विरली परिसरातील अनेक गावांमध्ये वाघांचे दर्शन होत आहे. सर्वप्रथम १२ जानेवारी रोजी ढोलसर येथे वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. त्यानंतर कुणाला ना कुणाला वाघाचे दर्शन होत आहे. दरम्यान गुरुवारी विरली शेतशिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे दर्शन झाले.
विरली येथील बापूजी मस्के यांच्या शेतात तुरी तोडण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी शेतमजूर महिला या शेतात गेल्या. तूर तोडण्याचे काम सुरू असताना अचानक एका महिलेला वाघ दिसला. तिची पाचावर धारण बसली. तोंडातून शब्दही फुटत नव्हते. मात्र, मोठी हिंमत करून तिने आरडा ओरडा केला. काही महिलांनाही हा वाघ दिसला. त्यानंतर सर्वांनी जेवनाच्या शिदोऱ्या तेथेच सोडून पळ काढला. या घटनेची माहिती गावात होताच वाघ दिशेल या आशेने जीव धोक्यात घालून अनेकांनी शेतशिवारात गर्दी केली.
या घटनेची माहिती लाखांदूर वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली. मात्र, कुठलीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
शेतशिवारात तिसऱ्यांदा झाले दर्शन
ढोलसर येथील काही शेतकरी शेतात काम करीत होते. त्यावेळी त्यांच्या समोरून वाघ गेला. याच आठवड्यात सरांडी बुज. येथे सुद्धा काही शेतकऱ्यांना वाघ दिसला. त्यांनी वाघाचे छायाचित्र आपल्या मोबाइलमध्ये टिपले. गुरुवारी सकाळीसुद्धा विरली येथील मजुरांना कालव्यालगत दबा धरून बसलेला वाघ दिसला. तर तणसाची गाडी आणण्यासाठी गेलेल्या मजुरांनाही वाघाचे दर्शन झाले. सातत्याने वाघाचे दर्शन होत असल्याने सर्वत्र भीती पसरली आहे.