ग्रामीण भागात डॉक्टरांच्या दारातील रुग्णांची गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:55+5:302021-05-04T04:15:55+5:30
सिहोरा परिसरातील गावांत गेल्या पंधरवड्यात आजाराचे प्रमाण वाढले होते. घराघरांत रुग्णाची संख्या वाढली होती. कोरोना विषाणू संसर्ग असल्याचे भीतीने ...
सिहोरा परिसरातील गावांत गेल्या पंधरवड्यात आजाराचे प्रमाण वाढले होते. घराघरांत रुग्णाची संख्या वाढली होती. कोरोना विषाणू संसर्ग असल्याचे भीतीने नागरिकांनी शासकीय दवाखान्यात उपचारासाठी जाण्याचे टाळले होते. नागरिकांत गैरसमज निर्माण झाल्याने त्यांनी गावातील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी धाव घेतली होती. यानंतर ग्रामीण भागातील डॉक्टरच्या दारात रुग्णाची गर्दी सुरू झाली होती. सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. गावात तोडक्या सुविधा असताना गोठ्यातच क्लिनिक थाटले. रुग्णांना गोठ्यातच सलाईन लावले, त्यांना तिथेच औषधोपचार करण्यास सुरुवात केली. याच कालावधीत शहरात रुग्णांना बेड, औषधोपचार मिळत नसल्याची चर्चा असल्याने ग्रामीण भागातील रुग्णात कोरोना विषाणू संसर्गच्या आजार विषयी भीती निर्माण झाली होती. याच पंधरवड्याचे कालावधीत मृत्यूचे प्रमाण वाढले होते. यामुळे भीतीला बळ मिळत होते. परंतु आठवडाभरापासून नागरिकांत कोरोना संसर्गाविषयी असणारी भीती निघण्यास सुरुवात झाली आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण आजारातून बाहेर निघत असल्याने भीती नाहीशी होण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात सुरू करण्यास आलेले डॉक्टरांच्या क्लिनिकमधील गर्दी आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. याच कालावधीत गावात मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असल्याने नागरिक आता बिनधास्त होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागात नागरिक आजारातून बाहेर पडले असले तरी लॉकडाऊनचे पालन करीत आहेत. मास्क व सामाजिक सुरक्षाअंतराचे पालन करण्यात येत आहे. गावांत व शेतशिवारात वृक्षलागवड अधिक असल्याने नागरिक बहुतांश वेळ शेतशिवारात घालवत आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याचे कारणावरून शहरात धावाधाव सुरु झाली असताना ग्रामीण भागातील नागरिक ऑक्सिजनकरिता धावपळ करताना दिसत नाही. ना कुलर, ना पंखे फक्त निसर्गाच्या सानिध्यातील शुद्ध हवा घेण्यासाठी नागरिक घराचे बाहेर झोपत आहेत.
बॉक्स
दवाखान्यातील समस्यांचे काय :
चुल्हाड येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात डझनभर असणाऱ्या समस्या निकाली काढण्यात आले नाही. घाईगडबडीत दवाखाना हस्तांतरण करण्यात आले आहे. मूलभूत सुविधा नसल्याने रुग्ण आणि वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली आहे. लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर रणसंग्राम सुरू झाला आहे. आरोग्य सेवेच्या बाबतीत बेजबाबदारपणे यंत्रणा वागली असल्याने नागरिकांत संताप अन् आक्रोश आहे. आरोग्य वर्धिनी केंद्रात पाणीच नाही. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. आरोग्य यंत्रणेला हद कर दी आपणे, असे नागरिक बोलून लक्तरे ओढत आहे. आरोग्य सुविधांचे लचके तोडले जात असताना सिहोरा परिसरातील लोकप्रतिनिधी बिळात लपले असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. संकट काळात लोकप्रतिनिधी मदतीला धावून आले नाहीत.