पवनीतील ग्रामीण रुग्णालय हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 05:00 AM2021-08-15T05:00:00+5:302021-08-15T05:00:25+5:30
नागरी व ग्रामीण भागातील गरजूंना संकटसमयी आरोग्याची उत्तम सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाने शासनाने गरजेनुसार उभारले आहेत. बऱ्याच प्रमाणात नागरिकांना सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. कोरोना संकटाला सामोरे गेल्यानंतरही शासनाने आरोग्य सुविधांची गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
पवनी : तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयातील वाॅर्ड डेंग्यूसदृश आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण भरती असल्याने हाऊसफुल्ल आहेत, तर परिसरात रुग्णालयातील परिचारिका व अन्य कर्मचारी निवास असलेल्या ठिकाणी भंगार साहित्य पसरली आहेत. ग्रामीण रुग्णालय परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर टांगला आहे.
नागरी व ग्रामीण भागातील गरजूंना संकटसमयी आरोग्याची उत्तम सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाने शासनाने गरजेनुसार उभारले आहेत. बऱ्याच प्रमाणात नागरिकांना सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. कोरोना संकटाला सामोरे गेल्यानंतरही शासनाने आरोग्य सुविधांची गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही.
रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व अन्य कर्मचारी यांची संख्या कमी व अस्थायी किंवा कंत्राटी पद्धतीने भरती केलेले कर्मचारी जास्त अशी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. अस्थायी स्वरूपात काम करणारे काही वैद्यकीय अधिकारी गावात थाटलेल्या त्यांच्या दवाखान्यात जास्तीत जास्त वेळ कार्यरत राहतात व ग्रामीण रुग्णालयाकडे नाममात्र हजेरी लावून मानधनावर पूर्ण हक्क गाजवत आहेत. अशा संपन्न व्यक्तीवर कोणाचाही वचक नाही.
बाह्य रुग्ण कक्षात लांबच लांब रांग व त्यांची तपासणी करण्यासाठी एक किंवा दोन डॉक्टर अशी अवस्था ग्रामीण रुग्णालयात नेहमीच पाहायला मिळत आहे.
अत्यावश्यक रुग्ण उपचारासाठी पोहोचला की बाह्य रुग्ण तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना त्या रुग्णाकडे धाव घ्यावी लागते व बाह्यरुग्ण रांगेत ताटकळत असतात. यावर उपाय कोण शोधणार? अस्थायी किंवा कंत्राटी स्वरूपात नियुक्ती करताना गरजवंताची निवड केली तर असे डॉक्टर किंवा कर्मचारी जबाबदारी म्हणून रुग्ण सेवेत रममाण होतील.
रुग्णालयाच्या देखरेखीसाठी असलेल्या समितीला रुग्णालयात लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे अशी समिती वरिष्ठांनी बरखास्त करून नव्याने समिती स्थापन करावी.
रुग्णालय परिसरात मागच्या बाजूला रिकाम्या बाटल्यांचा ढीग आहे, त्यात प्रामुख्याने देशी-विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या आहेत. त्या बाटल्या परिसरात कशा आल्या.
भंगार साहित्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारा व्यक्ती असेल तर त्याने रुग्णालय परिसरात साठा का करावा? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे स्वच्छता मोहीम राबवली जात असताना रुग्णालय परिसरात अस्वच्छता कशी चालणार? याचाही गांभीर्याने विचार केला जावा. रुग्णालय प्रशासनाने परिसरात लक्ष देण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.