ग्रामीण शाळांनी टाकली कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:32 AM2019-05-19T00:32:13+5:302019-05-19T00:32:41+5:30

गावागावांत फोफावलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र संपूर्ण राज्यात आहे. मात्र लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याला अपवाद ठरत आहे. शिक्षण विभाग, गावकरी आणि शिक्षकांच्या सहकार्यातून जिल्हा परिषदांच्या शाळांनी कात टाकली आहे.

Rural schools | ग्रामीण शाळांनी टाकली कात

ग्रामीण शाळांनी टाकली कात

Next
ठळक मुद्देप्रत्येक शाळा डिजिटल । लाखनी तालुक्यात पब्लिक स्कूलच्या तोडीच्या शाळा गावागावांत

चंदन मोटघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : गावागावांत फोफावलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र संपूर्ण राज्यात आहे. मात्र लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याला अपवाद ठरत आहे. शिक्षण विभाग, गावकरी आणि शिक्षकांच्या सहकार्यातून जिल्हा परिषदांच्या शाळांनी कात टाकली आहे. या शाळांचा चेहरामोहरा बदलला असून पब्लिक स्कूलच्या तोडीच्या शाळा गावागावांत आहेत. परिणामी आता विद्यार्थी जिल्हा परिषदांच्या शाळांकडे वळत आहेत.
लाखनी तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक ८८ शाळा आहेत. या शाळांमध्ये २८७० मुले व ३०७२ मुली असे एकुण ५९४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ८८ शाळांमध्ये २८९ शिक्षक कार्यरत आहेत. लाखनी तालुक्यात २०१६-१७ मध्ये ५९८५ विद्यार्थी होते. तर २०१७-१८ मध्ये सहा हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. तालुक्यातील सहा शाळांची पटसंख्या १५ च्या खाली आहे. यात दैतमांगली १३, चिखलाबोडी १५, केसलवाडा (राघोर्ते) १४, सायगाव ५, धानला (खराशी) १, सोनेखारी १३ या शाळांचा समावेश आहे.
तालुक्यात नामवंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. या शाळांचा दर्जा वाढविण्यावर भर दिला जात आहे. स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांनी अद्यावत राहावे यासाठी तालुक्यातील ८८ शाळा डिजीटल झाल्या आहेत. अनेक शाळांत सेमी इंग्रजी माध्यम सुरु केले आहेत.
जिल्हा परिषद शाळेत ज्ञानरचनावादी पद्धतीतून अध्यापन केले जाते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरणाची निर्मिती केली जाते. जि.प. शाळेत जाणारा विद्यार्थी शेतकरी शेतमजुरांचा असतो. त्यामुळे त्यांच्या सर्वांगिण व्यक्तीत्वाच्या विकासाची जबाबदारी शाळांची असते. शाळांचे रमणीय वातावरण निसर्गसौंदर्य व इतर उपलब्ध होणारी सुविधा यात मोफत पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार योजना, ग्रामपंचायतीच्या शिक्षण निधीद्वारे जाणाऱ्या सुविधांचा समावेश आहे. यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता कॉन्व्हेंट व पब्लिक स्कुलच्या तोडीच्या झाल्या आहेत.
परंपरागत जिल्हा परिषद शाळांचा ढाचा बदलला आहे. शाळा संगणकीकृत झाल्या आहेत. पाटीपुस्तकांशी संगणकांची कळ विद्यार्थ्यांच्या हाती आली आहे. प्रोजेक्टरवर प्रकरणांची माहिती दिली जाते. ई लर्निंग, डिजीटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक यामुळे या शाळांनी कात टाकली आहे. शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने विद्यार्थी आता दर्जेदार शिक्षण घेत आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बावनकुळे म्हणाले, विद्यार्थ्यांना गणवेश उपस्थिती भता, पोषण आहार आणि स्पर्धात्मक परीक्षेतून आलेले उच्चअहर्ताप्राप्त शिक्षक आहेत.

प्रवेशासाठी रांगा
तालुक्यातील खराशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशासाठी रांग लागतात. ती जिल्हा परिषदेची आदर्श शाळा आहे. तालुक्यातील गडेगाव, लाखोरी, सोमलवाडा, केसलवाडा, लाखनी, किटाडी, शिवणी, चान्ना, मिरेगाव, रेंगेपार (कोहळी), मानेगाव (सडक) याशाळाही अद्यावत झाल्या आहेत. जिल्ह्यात शिक्षक विद्यार्थ्यांसाठी भटकंती करीत आहेत. तर दुसरीकडे लाखनीच्या खराशी शाळेत पालकांची रांग लागली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत प्रशिक्षित शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेसाठी पोषक वातावरण आहे. लाखनी तालुक्यातील चार प्राथमिक शाळेत सायन्स लॅब आहे. विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मुल्यमापन केले जाते. इंग्रजी माध्यमातून विज्ञान, गणित शिकविले जाते.
-दिलीप वाघाये, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, लाखनी
 

Web Title: Rural schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा