एस. एन. मोर महाविद्यालयात 'लिंगभाव, पुरुषसत्ता व स्त्रीवाद'वर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:25+5:302021-04-04T04:36:25+5:30
एम्पावर फाउंडेशन, एक स्वप्न, एक आशा व मावा तसेच एस. एन. मोर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात ...
एम्पावर फाउंडेशन, एक स्वप्न, एक आशा व मावा तसेच एस. एन. मोर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. नारायण भोसले व डाॅ. निर्मला जाधव उपस्थित होते. याशिवाय राज्यभरातील अनेक विचारवंत, संशोधक, विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डाॅ. चेतनकुमार मसराम म्हणाले "कुठल्याही पद्धतीचा भेदभाव व वर्चस्व हे निषेधार्हच असते. भारतीय समाजात लिंगाधारित विषमतेला मोठा इतिहास आहे. समाजातील तरुण वर्गाने तो समजून घेऊन त्याविरोधात भूमिका घ्यायला हवी. देशातील तरुणांनी ठरविल्यासच देशात क्रांती होऊ शकते. आणि खरी क्रांती ही स्वतःच्या वर्तनात बदल करूनच होऊ शकते." यावेळी लिंगभाव, पुरुषसत्ता व स्त्रीवाद या विषयावर चर्चा झाली.
त्यानंतर पहिल्या सत्रात प्रवीण थोटे यांनी 'लिंगभाव' या विषयावर मांडणी केली. यावेळी ते म्हणाले की, "लिंगभाव ही एक व्यापक संकल्पना आहे. केवळ स्त्री आणि पुरुष इथपर्यंत तिचा मर्यादित अर्थ नाही, तर भिन्नलिंगीय, किन्नर अथवा निरनिराळ्या स्वरूपाच्या लैंगिक, भावनिक व शारीरिक गरजा असणाऱ्या अशा सर्वांचाच यात समावेश होतो. या सर्व समाजघटकांना सर्वार्थाने समजून घेत त्यांचे मूलभूत अधिकार व स्वातंत्र्य प्रस्थापित करणे व त्यासाठी कटिबद्ध राहणे म्हणजे लिंगभाव समानता जपणे होय. आपल्याकडे लिंगभाव संवेदनशीलतेवर प्रबोधन होणे काही अंशी शिल्लक आहे. ते काम तरुणांनी पूर्ण करायला हवे." याप्रसंगी मावा संस्थेचे संस्थापक हरिष सदानी म्हणाले, "पुरुषप्रधान वर्चस्व संपवून समताधिष्ठित समाज निर्माण करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. समाजात असलेली लिंगभावात्मक विषमता, पुरुषी वर्चस्व ही व्यवस्थात्मक बाब असून, त्याची सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक अशी अनेक कारणे आहेत. नवा विवेकशील समाज निर्माण करण्याची जबाबदारी केवळ स्त्रियांची नसून सर्वांचीच आहे. त्यामुळे पुरुषांनी यात हिरिरीने पुढाकार घ्यावा व सामाजिक न्यायात आपले योगदान द्यावे." प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. रेणुकादास उबाळे यांनी केले. संचालन प्रा. अमोल खांदवे व सीमा पंचभाई यांनी केले. आभार कार्यशाळेचे समन्वयक डाॅ. राजेश दीपटे व प्रीतम निनावे यांनी मानले.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 'पुरुषसत्ता' या विषयावर सूरज पवार यांनी मांडणी केली. या सत्राचे अध्यक्ष डाॅ. केदार देशमुख होते. यावेळी देशमुख म्हणाले, "आज पुरुषांनी स्त्रीवाद समर्थक भूमिका घेणे अत्यावश्यक बनले आहे. भारतातील पुरुषत्वसुद्धा एकजिनसी नसून, विविध प्रकारचे आहे. लिंगभाव प्रश्न समजून घेत त्याची कृतिशील सोडवणूक करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे." या सत्राचे सूत्रसंचालन मुकेश शेंडे यांनी केले. आभार डाॅ. विजय वर्हाटे यांनी मानले.
या कार्यशाळेतील शेवटच्या सत्रात 'स्त्रीवाद' या विषयावर वनिता तुमसरे यांनी मांडणी केली. जागतिक स्तरावर स्त्रीवादाचे उदारमतवादी स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, आंबेडकरवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद असे अनेक प्रकार त्यांनी नमूद केले. या सत्राचे अध्यक्ष डाॅ. प्रदीप मेश्राम होते. त्यांनी या विषयावर आपली मौलिक मांडणी केली. यावेळी लिंगभाव, पुरुषसत्ता व स्त्रीवाद या विषयावर मौलिक चर्चा झाली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अनेक ज्वलंत व व्यावहारिक मुद्यांवर चर्चा झाली.
या कार्यशाळेच्या समारोपीय सत्राचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम होते. यावेळी ते म्हणाले की, "अखंड मानवतावाद हेच स्त्रीवादी विचारातील महत्त्वाचे व मूलभूत सूत्र असून, हा विचार समाजाला जोडणारा विचार आहे. आजच्या तरुण पिढीने लिंगभाव समजून घेत धर्मव्यवस्था, जातिव्यवस्था व समाजव्यवस्थेची परखड चिकित्सा करायला हवी. यातूनच त्यांच्या अर्थपूर्ण जगण्याचा मार्ग समृद्ध व प्रशस्त होईल." या कार्यशाळेतील शेवटच्या सत्राचे सूत्रसंचलन महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील डाॅ. कविता लेंडे यांनी केले. डाॅ. अरुणा बावनकर यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी कार्यशाळेचे समन्वयक प्रा. रेणुकादास उबाळे व डाॅ. राजेश दीपटे तसेच प्रवीण थोटे, प्रा. अमोल खांदवे, डाॅ. राहुल भगत, डाॅ. विजय वर्हाटे, डाॅ. राजेंद्र बेलोकार, प्रा. लक्ष्मण पेटकुले, डाॅ. मधुकर जाधव, डाॅ. भारती काटेखाये व प्रीतम निनावे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेसाठी महाराष्ट्रभरातून ७०२ विद्यार्थी, संशोधक व कार्यकर्त्यांनी नोंदणी केली.